
अरबी समुद्रात एका इस्रायली व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जहाजावर मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या जहाजावर काही भारतीय कर्मचारीही आहेत. आता या जहाजाशी संपर्क झाला असून, या जहाजाचा व्हिडिओही समोर आलाय.
नवी दिल्ली- अरबी समुद्रात इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जहाज उद्ध्वस्त झालंय. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जहाजावरील क्रू मेंबर्समध्ये 20 भारतीयांचा समावेश आहे. दोन सागरी एजन्सींच्या मते, या जहाजांचा इस्रायलशी थेट संबंध आहे. हा हल्ला भारतापासून वेरावळच्या नैऋत्येस 200 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या Unmanned Aerial System (UAS) द्वारे करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. ब्रिटीश सैन्याच्या विशेष युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) तसंच सागरी सुरक्षा फर्म आंब्रे यांनी सांगितलं की, जहाजावर विविध रसायने होती. तसंच हे जहाज इस्रायलशी संबंधीत आहे.
भारतीय जहाज घटनास्थळी रवाना…
भारतीय संरक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातील बंदरातून मंगळुरूला जात होतं. भारतीय तटरक्षक दलाचं जहाज ICGS विक्रम घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच आसपासच्या परिसरात भारतीय नौदलाच्या युद्धनौकाही ‘एमव्ही केम प्लुटो’ या व्यापारी जहाजाकडं जात आहेत. भारतीय तटरक्षक डॉर्नियर सागरी पाळत ठेवणाऱ्या विमानाने एमव्ही केम प्लूटो या संकटग्रस्त जहाजाशी संवाद स्थापित केला आहे. ड्रोन हल्ल्यानंतर, जहाजाने आपली स्वयंचलित ओळख प्रणाली बंद केली. जहाजाचा मागोवा घेण्यासाठी ती वापरली जाऊ शकते. जहाजाची ऊर्जा निर्मिती यंत्रणा आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसंच जहाज पुढे जाण्यापूर्वी अधिक तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चालक दलात 20 भारतीय….
एमवी केम प्लूटो जहाजातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. यामध्ये सुमारे 20 भारतीयांचाही समावेश आहे. ICGS विक्रमनं या भागातील सर्व जहाजांना मदत देण्यासाठी सतर्क केलं आहे. ICGS विक्रम जहाज भारतीय आर्थिक क्षेत्राच्या गस्तीवर तैनात होतं. त्यावेळी जहाजाला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झालं.
जहाजावर लायबेरियाचा ध्वज…
एका न्यूज एजन्सीनुसार, ब्रिटीश सैन्याच्या युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स आणि सागरी सुरक्षा फर्म आंब्रे यांनी सांगितलं की, अरबी समुद्रात भारतातील वेरावळजवळ एका व्यापारी जहाजावर ड्रोननं हल्ला करण्यात आला आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वृत्तानुसार, युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सनं सांगितलं की, हा हल्ला एका मानव विरहित हवाई यंत्रणेद्वारे करण्यात आला. मात्र, हा प्रकार कोणी केला, याचा तपास सुरू आहे. जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता. त्यावर केमिकलचे टँकर होते. जहाजाचा शेवटचा कॉल सौदी अरेबियाला करण्यात आला होता. जहाजावर हल्ला झाला तेव्हा, ते भारताजवळ होतं. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार सदर जहाजावर संपर्क प्रस्थापित झाला आहे.