
मंडणगड(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ. रामदास देवरे हे आपल्या 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा संस्था व महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते होते. यावेळी कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, सहकोषाध्यक्ष श्री. सुनील मेहता, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. विष्णू जायभाये, श्री. नितीन मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहूल जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. रामदास देवरे यांना त्यांच्या निरोगी दीर्घायूष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, सहकोषाध्यक्ष श्री. सुनील मेहता, श्री. सचिन थोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मश्री दादा इदाते म्हणाले, की संस्था ही एक कुटुंब असून आज या संस्थेतून एक व्यक्ती आपल्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त होत असल्याने दुःख होत आहे. आपल्या संयमी, मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले, त्यांनी स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
सत्कारमूर्ती डॉ.रामदास देवरे म्हणाले, की संस्थेने माझ्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी दिली, त्याला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. दिलेल्या संधीबद्दल संस्थेचे, विशेष करून पद्श्री दादा इदाते यांचे मी आभार मानतो. विशिष्ट ध्येय डोळयासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केल्यास निश्चित यश मिळते. पण त्यासाठी आपल्यासोबत काम करणा-या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असते. ते मला येथे मिळाले. त्याबद्दल सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.
याप्रसंगी संस्थापदाधिकारी, संचालक, हितचिंतक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.