वेद, शास्त्रांच्या अभ्यास जगण्यास दिशा देतात- डॉ. देवदत्त पाटील…

Spread the love

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव समारंभ

रत्नागिरी : वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून प्रामाणिक जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आणि पैशांची शुद्धता मिळते. मी मिळवलेला कष्टाचा पैसा आहे हे समाजात सांगण्याची धमक येते. वेद आणि शास्त्र हे आपणास जगावे कसे हे शिकवतात, असे प्रतिपादन रिवण, गोवा येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे चार विशेष पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम रविवारी रंगला. डॉ. देवव्रत पाटील यांनी सुरेख पद्धतीने वेद व शास्त्रांचा अभ्यास का केला पाहिजे हे उदाहरणांसह पटवून दिले. ते म्हणाले की, पूर्वीच्या पिढीने हाल अपेष्टा सहन केल्या. गाड्या नसल्याने मैलोनमैल चालत जाऊन शिक्षण घेतले. रहाटाने पाणी काढले, शेतात काम केले. परंतु माझ्या मुलांना असा त्रास होऊ नये म्हणून पालक सजग झाले. त्यामुळे मुलांचा शारिरीक व्यायामच होत नाही. साधारण १९९० च्या दशकानंतर ही परिस्थिती दिसू लागली. तुम्हाला कशात करिअर करायचे आहे, तसे शिक्षण घेण्याची प्रथा सुरू झाली. मोबाईलमुळे मुले आळशी बनली आहेत. भारतीय सैन्यात जाणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांचेही तेवढेच योगदान असते. डॉक्टर्स, इंजिनिअर्स या क्षेत्रात जाणाऱ्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळते. संस्कृत, वेद, शास्त्राचा अभ्यास करण्याकडे कल वाढू लागला आहे. आता तरुण मुले येऊ लागली आहेत. माझ्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केल्या आहेत, काहीजण अध्यापन करत आहेत.

पुढे डॉ. पाटील म्हणाले की….

वेद आणि शास्त्र जगावे कसे हे शिकवतात. येथे आपण कुटुंबाला न्याय देतो. माझ्याकडे शिकायला मुलं येतात, त्यांना विचारतो तुम्ही का येता, इथे नोकरीची निश्चिती नाही, भरपूर पैसा नाहीये. मुलांनी सांगितलं बाहेर भरपूर कट प्रॅक्टिस मार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवावे लागतात. खोटे बोलावे लागते. आम्हाला प्रामाणिक जगायचे आहे. पैशाची शुद्धता हवी आहे. आज समाजात मी मिळवलेला कष्टाचा पैसा आहे हे सांगण्याची धमक प्रत्येकात यायला हवी. मला माझ्या आजोबांनी सांगितले की गोव्यात वेद, शास्त्रांचा अभ्यास पाटील व उपाध्ये करतात आणि मी ठरवले व पुण्यात अध्ययन करून रिवणला पाठशाळा सुरू केली. आपलं मूळ सोडू नये. मुलांना आपण उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतो व ते तिथेच स्थायिक होतात. या मुलांच्या बुद्धिमत्तेचा भारत देशाला उपयोग होतो का याचा विचार करावा. इकडे पालकांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. वेद, शास्त्रांच्या अभ्यासाने मुले पालकांना कधीच सोडणार नाहीत. कॉर्पोरेट जगतातील नोकरदार मंडळी ऑफिसमध्ये जुळवून घेतात पण घरात पती-पत्नीचे जमत नाही, यामुळे घटस्फोट वाढत आहेत. परमेश्वराची भक्ती करा, पण प्रत्येक वेळी काहीतरी हवे म्हणून मागू नका.

या वेळी लहान वयात कांची मठाची तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण झालेला प्रियव्रत पाटील, जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन डॉ. तेजानंद गणपत्ये, राज्य संगीत नाट्य स्पर्धेत तबलावादनात प्रथम विजेते प्रथमेश शहाणे आणि दहा वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कीर्तनसंध्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष अवधूत जोशी व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच इयत्ता पाचवी, आठवी, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यशस्वी ७० विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

आईनेच संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे!

सौ. अपर्णा पाटील म्हणाल्या की, अनेक ठिकाणी ब्राह्मण एकत्र येतात आणि जेव्हा ब्राह्मण एकत्र येतात तेव्हा युग परिवर्तन होते, हा इतिहास आहे.

आई पहिला गुरु त्यामुळेच घरामध्ये आईने संस्कार केले पाहिजेत. आई अंत:करणातून मुलाच्या अंतकरणापर्यंत पोहोचते आणि आईनेच मुलाला संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे. आई-बाबा जर मोठ्यांचा मान ठेवत असतील, तिन्ही सांजेला देवाचे स्मरण करत असतील तर मुलंही तशी होतात. ब्राह्मणांनी वेदाध्ययन करावे आणि आपला वेशही तसा ठेवावा.

गुरु हेच रहस्य

सत्काराला उत्तर देताना प्रियव्रत पाटील याने सांगितले की, आई-वडिल हेच माझे गुरु असून गुरु हेच रहस्य आहे. घरात वातावरण असेल तर माझ्या सारखे यश कोणीही मिळवू शकतो.

त्यामुळेच अवघड परीक्षा कमी वयात उत्तीर्ण झालो. तर डॉ. गणपत्ये म्हणाले की, ध्येय ठरवा, अथक मेहनत घ्या, अनेक गोष्टींचा त्याग करा आणि गुरुवर निष्ठा ठेवली तर यश आपलेच आहे. प्रथमेश शहाणे यांनी गुरुंना वंदन करून गुरुकृपेमुळेच यश मिळाल्याचे सांगून आजचा सत्कार पाहण्यास आई-वडिल, भाऊ आले असून हा आजचा घरचा सत्कार भाग्याचा क्षण आहे, असे सांगितले.

कीर्तन संध्यातर्फे मनोगत व्यक्त करताना उमेश आंबर्डेकर यांनी सांगितले की, हभप चारूदत्त आफळे बुवांच्या अमोघ वाणीतील कीर्तने आणि रत्नागिरीकरांच्या उदंड प्रतिसादामुळे कीर्तनसंध्या संस्थेचा उपक्रम सुरू आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने जे कौतुक केले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

मान्यवरांचा सन्मान संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केला. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, तेजश्री जोशी आणि सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. मानस देसाई यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाकरिता इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांचे बहुमोल योगदान लाभले.

या वेळी व्यासपीठावर सत्कारमूर्तींसह संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, श्री विद्या पाठशाळेच्या विदुषी डॉ. सौ. अपर्णा पाटील, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत हळबे, अॅड. प्रिया लोवलेकर उपस्थित होते. कार्यक्रमास वे. मू. पोखरणकर गुरुजी, वे. मू. मुरवणे गुरुजी, वे. मू. तन्मय हर्डीकर आणि सौ. कल्याणी हर्डीकर यांच्यासमवेत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page