मुंबई : दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअॅपवरील डीपीमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत असलेल्या किरण सामंत यांनी डीपीवर ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह ठेवलं होतं. तसेच, कॅप्शनला ‘जो भी होगा देखा जागेया’ असं लिहिण्यात आलेलं. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या होत्या. यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
उदय सामंत म्हणाले, “मी आणि माझे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. याविषयाला पूर्ण विराम मिळालेला आहे. किरण सामंत स्वत:हा ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेत आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल किरण सामंत यांनीही खुलासा केला आहे. कुटुंब म्हणून राजकीय आणि सामाजिक निर्णय एकत्र बसून घेतो.”
“…तसं कुणी करू नये”
“आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार आहोत. चुकून डीपी बदलल्यानं किरण सामंत यांना आपल्याकडं घेऊयात, असं काहींना वाटत असेल. पण, तसं कुणी करू नये,” असेही उदय सामंत यांनी म्हटलं.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला”
व्हॉट्सअॅप डीपी प्रकरणावर किरण सामंत यांनी सांगितलं, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारणं होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”
“उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं”
‘जो भी होगा देखा जाये गा’ असं कॅप्शन लिहिण्याबाबत किरण सामंत म्हणाले, “शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांचं राजकीय करिअर खराब होऊ नये.”