दूरदर्शनचा रंग झाला भगवा! तर विरोधक झाले लालेलाल, मोदी सरकारवर हल्लाबोल …

Spread the love

दूरदर्शननं आपल्या बोधचिन्हाचा (लोगो) रंग केशरी केला आहे. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली : ‘दूरदर्शन’नं आपल्या ऐतिहासिक लोगोचा रंग बदला आहे. यापुढं दूरदर्शनचा लोगो तुम्हाला भगवा दिसणार आहे. डीडी न्यूजच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे ही घोषणा करण्यात आली. यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे. त्यावर विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. दूरदर्शनच्या इंग्रजी वृत्तवाहिनी DD News नं अलीकडंच X वर एक नवीन प्रचारात्मक व्हिडिओ शेअर करताना त्याचा लोगो प्रदर्शित केला आहे.

डीडी न्यूजचं भगवाकरण….

व्हिडिओबरोबरच, डीडी न्यूजनं लिहिलं की, ‘आमची मूल्ये तीच आहेत, आम्ही आता एका नवीन अवतारात उपलब्ध आहोत. पूर्वी कधीही नसलेल्या बातम्यांच्या प्रवासासाठी सज्ज व्हा… सर्वांनी नवीन डीडी न्यूजच्या बातम्यांचा अनुभव घ्यावा.’ मात्र, या बदलामुळं विरोधक संतप्त दिसत आहेत. या निर्णयावर राज्यसभा सदस्य आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी टीका केली आहे. जवाहर सरकार म्हणाले की, त्यांनी राष्ट्रीय प्रसारण संस्थेचं ‘भगवाकरण’ केलं आहे. दूरदर्शननं आपला ऐतिहासिक लोगो भगव्या रंगात रंगवला आहे. माजी सीईओ या नात्यानं ‘मी’ त्यांच्या भगवेकरणाकडे चिंतेनं पाहात आहे. मला असंही वाटतं की, ती आता प्रसार भारती नाही, तर ती प्रचार भारती झाली आहे. जवाहर सरकार 2012 ते 2014 दरम्यान प्रसार भारतीचे सीईओ होते.

डीडी न्यूजचं स्वरूप बदललं…

मात्र, प्रसार भारतीचे विद्यमान सीईओ गौरव द्विवेदी यांनी जवाहर सरकार यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे. व्हिज्युअल, सौंदर्यशास्त्राला अनुरूप असा लोगो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या लोगोचा रंग केशरी असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. गौरव द्विवेदी म्हणाले की, चमकदार, आकर्षक रंगांचा वापर चॅनेलच्या ब्रँडिंग आणि व्हिज्युअल सौंदर्यावर आधारित आहे. केवळ लोगोच नाही, तर चॅनेलनं नवीन उपकरणाचा संस्थेत समावेश करून त्याचं स्वरूप बदलं आहे.

सरकारी संस्थावर कब्जा करण्याचा भाजपाचा प्रयत्न…

लोगोचा रंग बदलणे हा सरकारी संस्थांवर कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी केला. मनीष तिवारी हे स्वतः 2012 ते 2014 पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री होते. ‘सरकारी संस्थांचं भगवेकरण करण्याचा आणि त्यावर कब्जा करण्याचा भाजपा सरकारचा हा प्रयत्न आहे. हे पाऊल भारताच्या सार्वजनिक प्रसारकाची तटस्थता, विश्वासार्हता कमी करत आहे’.

दूरदर्शनचा इतिहास….

15 सप्टेंबर 1959 रोजी सरकारी प्रसारक म्हणून दूरदर्शनची स्थापना झाली. दूरदर्शन सुरू झालं, तेव्हा काही काळ कार्यक्रमांचं प्रसारण झालं. ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून 1965 मध्ये नियमित दैनिक प्रसारण सुरू झालं. राष्ट्रीय प्रक्षेपण 1982 मध्ये सुरू झालं. त्यानंतर दूरदर्शन रंगीत स्वरुपात आलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page