*रत्नागिरी, दि. 23 मे 2024 : जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. नगरपरिषदेने साईड पट्ट्या युध्दपातळीवर कराव्यात. शहर परिसरात सुरु असणाऱ्या कामांच्या ठिकाणी पाणी साचणार नाही, विशेषत: रस्त्यावर, याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसाच्या अनुषंगाने आणि नैसर्गिक आपत्ती नियोजनाबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज सकाळी दूरदृश्यप्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन म्हणाले, मिऱ्या-नागपूर-कोल्हापूर महामार्गावर कुवारबाव येथे तसेचे हातखंबा येथे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित भरावेत. जेम्स ॲण्ड ज्वेलरी आणि मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर जिल्ह्यातही नियंत्रण कक्ष उभे करावे. महामार्गावर, प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्याबाबत प्रस्ताव द्यावा. तहसीलनिहाय, प्रमुख शहरनिहाय आपत्ती व्यवस्थानाबाबत काय नियोजन केले आहे, याची माहितीही द्यावी, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी मान्सूनपूर्व 39.5 मिमी पाऊस झालेला असून, 29.6 हेक्टर शेती नुकसान झाल्याची माहिती दिली. वादळी पावसात महावितरणचे साडेतीनशे ते चारशे पोलचे नुकसान झाले आहे. तरीही युध्दपातळीवर महावितरणने डाऊन झालेले उपकेंद्र सुरु केल्याची माहिती दिली.