देवरुख- राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगारातून विविध मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बस या विलंबाने सुटत असल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. बस विलंबाने सुटण्यामागे असणारी कारणे शोधून जबाबदार मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाच्या वतीने परशुराम पवार यांनी केली आहे.
देवरुख आगाराकडे सध्या पाच सीटर स्लीपर बस उपलब्ध असताना अनेकदा देवरूख पुणे बस साधी सोडली जाते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो आणि तिकीट भाडे परत घेण्यासाठी प्रसंगी वादावादी करावी लागते. देवरुख आगाराकडे जर पाच स्लीपर सिटर बस उपलब्ध आहेत, तर देवरुख पुणे मार्गावर अनेकदा साधी बस का सोडली जाते ? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. आज ११ ऑक्टोबर रोजी देवरुख पुणे बस जवळपास दोन तास विलंबाने सुटली. या बस वर काम करणारे वाहक वेळेत उपस्थित न झाल्याने ही बस सुटण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
नोकरीवर विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देवरुख आगार प्रमुखांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने प्रवाशांनी केली आहे. देवरुख बस स्थानकातून बस वारंवार विलंबाने सुटत असल्याने देवरुख तसेच संगमेश्वर येथील वाहतूक नियंत्रकांसोबत बस विलंबाने सुटण्याच्या कारणांबाबत प्रवासी वर्गाची जोरदार वादावादी घडण्याचे प्रसंग घडत आहेत. या सर्व बाबींकडे देवरुख आगार प्रमुख तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गांभीर्याने पाहण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
देवरुख आगारात कर्मचाऱ्यांना दूर पल्याच्या मार्गावर ड्युटी लावत असताना , त्यांना वेळेचे भान समजावून सांगणे हे ड्युटी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या ड्युटीवर वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जागी अन्य कर्मचारी पाठवून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत या कारभारात सुधारणा होणार नाही असे मत परशुराम पवार यांनी व्यक्त केले आहे. येत्या काही दिवसात देवरुख बस स्थानकाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास नाईलाजाने प्रवाशांना आंदोलन करावे लागेल असा इशार आहे प्रवाशांच्या वतीने परशुराम पवार यांनी दिला आहे.