दिनेश कार्तिक पुन्हा एकदा आरसीबीसाठी ठरला तारणहार, घरच्या मैदानात आरसीबीचा पंजाबवर दणदणीत विजय…

Spread the love

आयपीएल २०२४ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि पंजाब किंग्स मॅच अपडेट

दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी आणि विराट कोहलीची विस्फोटक ७७ धावांच्या जोरावर आरसीबीने आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. दिनेश कार्तिकचा शानदार चौकारासह आरसीबीने ३ चेंडू राखून पंजाबवर ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने सुरूवातीपासूनच आक्रमक अंदाज दाखवला आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. कार्तिकने त्याच्या १० चेंडूच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारासह २८ धावा केल्या. तर सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या महिपाल लोमरोरने त्याला साथ देत ८ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह १७ धावा केल्या. या दोघांच्या अखेरच्या षटकांमधील आक्रमक खेळीमुळे आरसीबीने आयपीएल २०२४ मध्ये पहिला विजय नोंदवला.

पंजाब किंग्सने दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात खूपच दणक्यात झाली. सॅम करनच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिले आणि ७व्या षटकात विराट कोहलीला जीवदान मिळाले. बेयरस्टोने स्लिपमध्ये कोहलीचा झेल सोडला. तर राहुल चहरनेही कोहलीचा झेल सोडला आणि याचा फटका पंजाबला पहिल्या षटकासह संपूर्ण सामन्यात बसला. कोहलीने विस्फोटक फलंदाजी करत बाद होण्यापूर्वी ४९ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ७७ धावा केल्या. कोहलीने पहिल्याच षटकात ४ चौकारांसह १६ धावा केल्या. पण फॅफ डू प्लेसिस आणि कॅमेरून ग्रीन मात्र या सामन्यात अपयशी ठरले आणि दोघेही ३ धावा करत रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाले. त्यानंतर आलेला रजत पाटीदार आज चांगल्या फॉर्मात असला तरी मोठी खेळी करू शकला नाही. पंजाबचा भेदक गोलंदाजी करणारा हरप्रीत ब्रारकडून त्रिफळाचीत होण्यापू्र्वी त्याने एक चौकार आणि षटकारासह १८ धावा केल्या. तर मॅक्सवेल आजच्या सामन्यातही अपयशी ठरला आणि ब्रारच्या गोलंदाजीवर ३ धावा करत क्लीन बोल्ड झाला.

विराट चांगल्या फॉर्मात असल्याने त्याला बाद करणं अवघड झालं होतं. पण आरसीबी संघातील त्याचा पूर्वीचा साथीदार हर्षल पटेल जो आता पंजाब संघाचा भाग आहे. त्याने विराटला झेलबाद केलं. विराट बाद झाल्यानंतर १४ धावांवर अनुज रावतही झेलबाद झाला. पंजाब संघाकडून हरप्रीत ब्रारने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांच्या स्पेलमध्ये १३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाच्या नावेही २ विकेट्स आहेत. सॅम करन आणि हर्षल पटेलच्या खात्यातही १-१ विकेट आहे.

तत्त्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना संघाची सुरूवात चांगली झाली,पण सलामीवीर बेयरस्टोने ८ धावा करत विकेट गमावली. तर शिखर धवन मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद होण्यापू्र्वी ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. शिखर धवनशिवाय कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. पण प्रत्येकाने संघाच्या धावांमध्ये भर घातली. प्रभसिमरन सिंग (२५), लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्मा (२७) या चौघांनाही बाद करण्यात गोलंदाजांसोबतच विकेटकीपर अर्जुन रावतने मोठी भूमिका बजावली. त्याने या चौघांचेही झेल टिपले.

पंजाबच्या शशांक सिंगने आपल्या छोट्या पण प्रभावी खेळीने सर्वांनाच चकित केले. शशांक सिंगने अखेरच्या षटकात ८ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. त्याच्या या अखेरच्या षटकातील फटकेबाजीमुळे संघाची धावसंख्या १७६ वर नेऊन ठेवली. आरसीबीकडून यश दयाल आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी १ विकेट घेतली तर मॅक्सवेल आणि सिराजने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page