नागपूर- इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. १४ ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजचा दिवस भारताच्या सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीच्या दिवशी अर्थात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांनाही बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तेव्हापासून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी बौद्ध धर्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ ला घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पवित्र झाल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ असंही म्हणतात. 1935 मध्ये नाशिकच्या येवल्यामध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले होते. अस्पृश्यता, भेदाभेद याविरोधात बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी आणि शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होतं. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. भारतासह जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही इथे उपस्थित राहतात.