तब्बल १२ हजार कोटींची मोदी आवास योजना.
भूमिहीन नागरिकांना चिंतामुक्त करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनःपूर्वक धन्यवाद!
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर २९, २०२३.
महाराष्ट्रातील महायुती सरकार जनतेप्रती कटिबद्ध आहे हे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून वारंवार सिद्ध होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १२ हजार कोटींची मोडी आवास योजना राज्यातील ओबीसी बांधवांसाठी कार्यान्वित केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये इतर मागासवर्गीयांसोबतच विशेष मागासवर्गीयांनाही लाभ मिळावा ही ना. देवेंद्र फडणवीस यांची सूचना ओबीसी कल्याणमंत्री डॉ. अतुल सावे यांनी प्राधान्याने विचारात घेऊन तसे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत आगामी ३ वर्षांच्या काळात तब्बल १० लाख कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळणार आहे. डोंगरी भगत घराचे बांधकाम करण्यासाठी १.३० लाख रुपये तर अन्य भागांत १.२० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. घरासाठी जागा नसलेल्या भूमिहीन कुटुंबांसाठी १०-१० जणांचे गट करून शासकीय जमीन देण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. अपरिहार्य परिस्थितीत उपलब्ध जागा अपुरी असेल किंवा जागा उपलब्ध होणे शक्य नसेल त्याठिकाणी ५० हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान जमीन खरेदीकरिता देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी महाराष्ट्र शासन १२ हजार कोटींचा भार उचलणार असल्याने पंतप्रधान घरकुल योजनेचा अद्याप लाभ न मिळालेल्या किंवा प्रतीक्षा यादीत असलेल्या ओ.बी.सी. व एस.बी.सी. कुटुंबांना या नव्या योजनेचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे. योजनेला राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. याबाबत संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव म्हणाले, “केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारनेही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच ओ.बी.सी. कल्याणमंत्री डॉ. अतुल सावे यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होणारी ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरणार आहे. मुलभूत गरजांपैकी एक असणाऱ्या घरासाठी नागरिकांचे परिश्रम लक्षात घेऊन ही योजना अत्यंत संवेदनशीलतेने अंमलात आणणाऱ्या सर्व नेत्यांना महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो.”