उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
*मुंबई :* उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. तसंच आता मी ‘डेडिकेटेड फॉर कॉमन मॅन’ अर्थात ‘डीसीएम’ असल्याचाही उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला. तसंच ‘लाडकी बहीण योजने’बाबातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली. त्यामुळं आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे पाठवणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले
*मी नाराज ही खोटी बातमी…*
मुख्यमंत्रिपद तसंच गृहमंत्रिपदावरुन एकना्थ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण देत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “27 तारखेलाच मी भूमिका स्पष्ट केली होती. मोदी – शाह घेतील त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं मी आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळं मी नाराज असल्याच्या सर्व खोट्या बातम्या होत्या,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच शपथविधी सोहळ्याला श्रीकांत शिंदे ह उपस्थित नसल्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे म्हणाले, शपथविधी सोहळ्याला श्रीकांत शिंदे हे होते. पुढील रांगेत ते खाली बसले होते. त्यांच्या विनाकारण बातम्या चालवल्या जात आहेत. कोणत्याही रेसमध्ये ते नव्हते तरीही बातम्या दिल्या जात होत्या.”
*डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर मिळणार :*
शपथविधी झाल्यानंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. ‘लाडकी बहीण योजने’च्या डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना कॅबिनेट बैठकीत अधिकाऱयांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
*फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं :*
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्य सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळं अडीच वर्षाचा काळ पूर्ण झाला. लाडक्या बहिणींचं मनापासून अभिनंदन करतो. अडीच वर्षात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. मागील अडीच वर्षात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं सहकार्य केलं. अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं होतं. आता मी त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं,” असं म्हणत या सरकारला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा पुन्हा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला.