अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी रोमहर्षक विजय; डेव्हिड मिलरची तुफानी खेळी व्यर्थ…

Spread the love

नवीदिल्ली- आयपीएल २०२४ च्या ४० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर गुजरात टायटन्सचं २२५ धावांचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीचा झाला. शेवटी दिल्लीनं गुजरातवर ४ धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातची टीम 8 गडी गमावून 220 धावाच करू शकली.

गुजरात टायटन्ससाठी डेव्हिड मिलरनं तुफानी फटकेबाजी केली. तो 23 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्यानं 6 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले. तो क्रिजवर असेपर्यंत गुजरातच्या विजयाच्या आशा कायम होत्या, मात्र तो 18व्या षटकात बाद झाला आणि गुजरातच्या विजयाच्या आशा मावळल्या. मुकेश कुमारनं मिलरची विकेट घेतली. मुकेश कुमारनं अखेरच्या षटकात 19 धावा डिफेंड केल्या. शेवटच्या षटकात राशिद खानंनं 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. गुजरातला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता होती. मात्र राशिद खान संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही. गुजरातसाठी साई सुदर्शननं 39 चेंडूत 65 धावा केल्या. त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋद्धिमान साहानं 25 चेंडूत 39 धावाचं योगदान दिलं.

गुजरातचे इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. दिल्लीसाठी कुलदीप यादवनं शानदार गोलंदाजी करताना 2 विकेट घेतल्या. त्यानं आपल्या 4 षटकांत केवळ 29 धावा दिल्या. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतनं 43 चेंडूत 88 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. तर अक्षर पटेलनं 43 चेंडूत 66 धावांचं योगदान दिलं. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सनं शानदार फलंदाजी करत 7 चेंडूत 26 धावा ठोकल्या. दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात अवघ्या 68 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, संदीप वारियर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं दिल्लीच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय नूर अहमदला 1 विकेट मिळाली. मोहित शर्मानं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी टाकली. त्यानं 4 षटकात 73 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page