*चिपळूण-* चिपळूण शहरातील माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी पत्रकारांची बदनामी होईल, अशी अश्लील पोस्ट व्हाट्सअपच्या ग्रुपवर फॉरवर्ड केली.
याबाबत संतप्त झालेल्या चिपळूण शहरातील पत्रकारांनी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेऊन पत्रकारांची बदनामी करणाऱ्या या पोस्टबाबत सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांवर येत्या आठ दिवसांत कठोर कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वी शहरातील महत्त्वाच्या व्हाट्सअप ग्रुपवर माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्या पोस्टमधून महिला पत्रकार व अन्य एका पत्रकाराची बदनामी होईल, असा अश्लील मजकूर होता. या पोस्टमुळे सर्वच पत्रकारांकडे संशयाने पाहिले जात होते.
याबाबत पत्रकारांनी किशोर रेडीज यांना विचारणा केली असता रत्नागिरीतील पत्रकार आलिया काझी एडमिन असलेल्या कोकण २४ तास या ग्रुपवर आलेली पोस्ट आपण फॉरवर्ड केली असल्याचा दावा केला होता. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्याने त्यातून पत्रकारांची बदनामी झाली.
याबाबत पत्रकारांनी एकजूट दाखवत तातडीची बैठक घेऊन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले आहे.
ही पोस्ट तयार करणाऱ्यापर्यंत व ही पोस्ट जाणून-बुजून व्हायरल करणाऱ्यांपर्यंत पोलिसांनी पोहोचावे, या विषयाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर सतीश कदम, राजेंद्रकुमार शिंदे, प्रा. सुहास बारटक्के, योगेश बांडागळे, दीपक शिंदे, गजेंद्र खडपे, इकलाक खान, मकरंद भागवत, राजेंद्र शिंदे, संतोष सावर्डेकर, राजेश जाधव, संतोष कुळे, महेंद्र कासेकर, सुशांत कांबळे, बबन साळगावकर, स्वप्निल घाग, राजेश जाधव, शाहीद खेरटकर, संतोष पिलके, शकील तांबे, सुरेश पवार पिंट्या पाटील आदींच्या सह्या आहेत.
पत्रकारांच्या झालेल्या बैठकीत पत्रकारांची बदनामी करणारी पोस्ट वायरल करणाऱ्या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला.