युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांचे सा. बां. विभाग, चिपळूण यांना इशारा.
▪️ चिपळूण तालुक्यातील गोवळकोट चिपळूण येथे दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचा एक पिलर खचला असून त्यामुळे सदर पूल सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शिवाय या पुलाचा दुसरा पिलरदेखील खचला असल्यामुळे पुलाचा दुसरा व तिसरा स्लॅब कमकुवत झालेला आहे. या पुलाचे नूतनीकरण व कॉंक्रीटीकरण तात्काळ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी या भागातील नागरिकांना सोबत घेऊन चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
▪️ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष वहाब सुर्वे, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, रिक्षा युनियन उपाध्यक्ष आनंद पवार, सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ कादरी, रिक्षा चालक बंड्या दादा, मुस्तफा पटेल, आसिफ खान आदी उपस्थित होते. बायपास एनरॉन पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन यासंदर्भात चर्चादेखील केलेली आहे. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी यासंदर्भात पत्रव्यवहारदेखील करण्यात आला. त्यावेळी अभियंत्यांकडून सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे पत्र दि. ३० मार्च २०२२ रोजी श्री. सरगुरोह यांना पाठवण्यात आले होते. मात्र, या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही चिपळूण सार्वजनिक बांधकाम कार्यालयाने अद्याप तांत्रिक मंजुरी प्राप्त करून घेतलेली नाही. यावरून शासन स्तरावर दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
▪️ चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या कामासाठी आतापर्यंत पाच वेळा टेंडर प्रक्रिया पार पडली. आता सहाव्यांदा टेंडर प्रक्रिया झाली असून हे काम आता कॉन्ट्रॅक्टरने घेतले आहे. मात्र अद्याप तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. या कामासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात असून येथील जनतेची निव्वळ दिशाभूल केली जात आहे. पूल बंद असल्याने शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याला अवघे चार महिने शिल्लक असून या पुलाच्या दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे. प्रत्यक्ष आमच्या समक्ष यावे आणि तांत्रिक मंजुरीचे पत्र आम्हाला द्यावे व काम कधी सुरू होईल हे तात्काळ कळवावे, अन्यथा येथील स्थानिक नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दि. ७ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण छेडावे लागेल, असा गर्भित इशाराही साजिद सरगुरोह यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.