आज शनिवार, १८ मे २०२४ रोजी चंद्र कन्या राशीतून आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. हर्षण योग व वणिज करण आहे. चंद्र केतुशी संयोग करीत मंगळ राहु आणि नेपच्युनशी प्रतियोग करीत आहे. या सर्व संयोगामध्ये प्रत्येक राशीनुसार आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल ते पाहूया.
▪️मेष
आज शनिवारी चंद्र संक्रमण शुभ स्थानातून होत आहे. एक प्रकारची प्रेरणा मनात निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी वृत्तीच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची भावना मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग जुळून येतील. नवीन उमेदीने कामाला लागा.
▪️वृषभ
आज चंद्र रविच्या नक्षत्रातून संक्रमण करणार असून उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. एखाद्या विषयाच्या मूळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे इतरांना तुम्ही जरा विचित्र वाटाल. शिवाय काळाच्या पुढे विचार करण्याची वृत्ती ठेवाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहाणार आहे.
▪️मिथुन
आज चंद्राचा मंगळशी होणारा संयोग पाहता व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी त्या गोष्टी बाजूला ठेऊन प्रयत्नाला अधिक महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे काळजीने लक्ष द्याल.
▪️कर्क
आज चंद्रबल उत्तम लाभल्याने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल
▪️सिंह
आज चंद्र हर्षण योगात असताना नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच वाढेल. नवीन संधी तुमच्या हातात येईल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. तुम्हाला उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल.
▪️कन्या
आज मंगळाचा चंद्राशी होणारा संयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील.
▪️तूळ
आजच्या चंद्र संक्रमणात वैवाहिक आयुष्यात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील दबावाचे वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल.
▪️वृश्चिक
आज चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग अनुकुल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत.
▪️धनु
आज आर्थिकदृष्ट्या करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील.
▪️मकर
आज चंद्राशी होणारा योग पाहता थोडेसे धूर्त संयमितपणाबरोबरच धोरणी राहाल. एखाद्या गोष्टीबाबत स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योगप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे.
▪️कुंभ
आज चंद्राचा केतुशी संयोग होत आहे. नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल.
▪️मीन
आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल.