पंधरा मिनिटाच्या  पावसासह चक्रीवादळाचा मुरबाडला फटका प्रचंड नुकसान मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक व मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर..

Spread the love


*ठाणे / मुरबाड-* काल मंगळवारी रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास मुरबाड शहरात परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. अचानक मुरबाड शहरावर चक्रीवादळाने प्रचंड आक्रमण केल्याने मुरबाडकर भयभीत झाले. या चक्रीवादळामुळे मुरबाड शहर व परिसरातील नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले तर मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेतील लाईटची मुख्य लाईन तुटून रस्त्यावर पडल्याने काल रात्री पासून आता पर्यंत मुरबाडकर अंधारात असून पिण्याचे पाणी सुद्धा नलांना लाईट नसल्याने येणार नसल्याने मुरबाडकर हतबल झाले आहेत.

काल मुरबाड शहर व परिसराला अचानक आलेल्या वादळी पावसाने झोडपले असून नागरिकांच्या घरांसह सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक रात्री आलेल्या चक्री वादळाचा वेग प्रचंड असल्याने शहरातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. फक्त १५ मिनिटे जोराचा  वादळी पाऊस व सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने नेमकं काय होतंय हे मुरबाडकर नागरिकांना समजत नव्हते .या वादळाने शहरातील विद्युत खांब , विजेच्या तारा रस्त्यावर तुटुन पडल्याने शहरासह ग्रामीण भागातील विज पुरवठा रात्री पासूनच खंडित झाला आहे तो कधी पुर्ववत होईल हे सांगता येत नाही. तर मुरबाड शहर व परिसरात मोठ मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर झाडांचा आडवी पडल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. मुरबाड शहर व परिसरातील नागरिकांच्या घरांचे पत्रे , कौले , भिंती कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी मनोज म्हसे उतरले रस्त्यावर …!

या घटनेची  माहिती मिळताच तात्काळ मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज म्हसे त्यांच्या अधिकारी वर्गासह उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करत होते. आज सकाळ पासून नगर पंचायतचे कर्मचारी वर्गाने रस्त्यावर पडलेली झाडे व तुटलेल्या फांद्या  काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले होते. मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे स्वतः लक्ष देऊन काम करून घेत असल्याचे दिसले. तर मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी हि या घटनेची तात्काळ दखल घेत महसूल विभागा मार्फत त्यांचे कर्मचारी मुरबाड नगर पंचायतीच्या प्रत्येक वार्डात झालेल्या नागरिकांच्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु केले असून १०० पेक्षा जास्त नागरिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मुख्याधिकारी म्हसे यांनी मुरबाड समाचारला दिली. नुकसानग्रस्त सर्वाचे पंचनामे करुन नागरिकांना लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page