राज्यामध्ये लवकर विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर आता शुभारंभ सोहळा घेण्यात आला. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकांची तोफ डागली. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पुणे : पुण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना सावत्र भाऊ म्हणत तुफान राजकीय फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणा टोला लगावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण रंगवले.
पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांचे मोल काय ?…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमावेळी म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही वर्षाचे अर्थिक नियोजन केले आहे. हे काय म्हणाले तर दीड हजार रुपयांमध्ये काय होणार? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांचे मोल काय कळणार? हे दीड हजार रुपयांचे मोल सर्वसामान्य महिलांना कळत आहे. हम दो हमारे दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार. यांना गरीबी काय माहित आहे? मीही शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझी आई कशी कसरत करायची मला माहीत आहे. माझ्या आई वडिलांनी कसे हाल सहन केले याचा मी साक्षीदार आहे. आम्ही संघर्ष करून आलो. सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो. आम्ही चटके सोसले आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल…
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, पैसे खात्यामध्ये जमा झाल्यानंतर अनेक बहिणी मला भेटल्या. त्यांनी पैसे मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता. अनेक महिलांसाठी हे दीड हजार रुपये मोठा आधार बनले आहेत. काही विधवा बहिणी देखील आहेत, त्यांनी त्यांचं दुख मांडलं. हे लाख मोलाचे पैसे असल्याची भावना या बहिणींनी व्यक्त केली. या राज्यातील सामान्य बहीण भाऊ आणि वरिष्ठ ज्येष्ठांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. आमचं सरकार तेच करतं. सर्व सामान्यासंसाठी या योजना राबवत असतो. काही लोकं म्हणाले पैसे मिळणार नाही. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर काढून घ्या. पण तुम्हाला सांगतो हे देणारं सरकार आहे. घेणारं नाही. ही देना बँक आहे. लेना बँक नाही. ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.