दिल्ली :- छत्तीसगड राज्याची स्थापना भाजपने केली. इथले समाजमन केवळ भाजपला कळते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने गंगेची खोटी शपथ घेतली. दारूबंदीसह ३६ आश्वासने दिली; पण हजारो कोटींचा दारू घोटाळा केला, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथील सायन्स कॉलेज मैदानावर भाजपच्या विजय संकल्प सभेत केला.
महाविद्यालयाच्या मैदानावरून पंतप्रधानांनी ७ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते. बिलासपूर येथील बस दुर्घटनेत मरण पावलेल्या ३ भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. छत्तीसगडच्या विकासाला काँग्रेसच्या पंजाने आवळून टाकलेले आहे. छत्तीसगडला तो लुटत आहे. भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही. भ्रष्टाचार हीच काँग्रेसची विचारसरणी आहे. छत्तीसगड हे काँग्रेस पक्षासाठी एटीएमसारखे आहे. कोळसा माफिया, वाळू माफिया आणि भूमाफिया इथे फोफावले आहेत. माझ्याविरुद्ध अनेक लोक कट रचत आहेत; पण मोदी घाबरत नाही. मोदी ही भ्रष्टाचारावरील कारवाईची हमी आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही मोदी म्हणाले.