
चंद्रपूर | महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील एका मंदिरात पोलिसांची ‘मॉक ड्रिल’ तेव्हा वादात सापडली, जेव्हा स्वतःला दहशतवादी म्हणवणारे कर्मचारी एका विशिष्ट समुदायाशी संबंधित नारे देत होते. याप्रश्नी वकिलांच्या गटाने जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याचवेळी पोलिस अधीक्षक (एसपी) रवींद्रसिंह परदेशी यांनी रविवारी सांगितले की, अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
येथील प्रसिद्ध महाकाली मंदिरात ११ जानेवारी रोजी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाने प्रार्थनास्थळावर कब्जा करून भाविकांना बंदी बनवले.
वकिलांच्या गटाचा एक भाग असलेले फरत बेग म्हणाले, “विशिष्ट घोषणा देत मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद्यांची भूमिका बजावणाऱ्या जवानांचे व्हिडिओ समोर आले आहेत. हे एका समाजाचे नकारात्मक पद्धतीने चित्रण करते आणि सर्व दहशतवादी याच समुदायातील असल्याचा आभास देते.”
बेग म्हणाले, “आम्ही अशा घोषणाबाजी आणि चित्रणाच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे. पोलिसांचे हे कृत्य समाजाला बदनाम करण्यासारखे आहे.”