नागपूर | नागपुरात केवळ २० रुपये देण्यावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीने एका पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने सपासप वार केले. नागपूर पोलिसांनी रविवारी म्हणजेच २२ जानेवारीला ही माहिती दिली.
जरीपटका पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाणीपुरी विक्रेता आणि एका व्यक्तीमध्ये २० रुपयावरून वाद झाला. वाद इतका वाढला की त्या व्यक्तीने रागाच्या भरात पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले.
माहिती देताना नागपूर पोलिसांनी सांगितले की, ती व्यक्ती पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलजवळील दुकानात काम करत असे. त्या व्यक्तीने पाणीपुरी विक्रेत्याला २० रुपये दिले नाहीत. त्यानंतर विक्रेत्याने ते पैसे मागण्याचा आग्रह धरला, मात्र त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला, यावरून वाद वाढू लागला. वाद झाला आणि त्या व्यक्तीने विक्रेता जयराम गुप्ता यांच्या पोटात चाकूने वार केला, असे जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.