अफगाणिस्तानच्या भारतातील वाणिज्यदूत जाकिया वार्दक यांनी राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे, दुबईहून मुंबईत येताना 25 किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपामध्ये सोने तस्करीचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय.
मुंबई : अफगाणिस्तानच्या भारतातील वाणिज्यदूत जाकिया वार्दक यांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, दुबईहून मुंबईमध्ये येताना 25 किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपामध्ये सोने तस्करीचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. “गेल्या वर्षभरात माझ्याविरोधात अनेक व्यक्तिगत आरोप करण्यात आले व माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळं कंटाळून राजीनामा देत आहे,” अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिलीय.
त्यांच्याकडं सापडलं 25 किलो सोनं…
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई विमानतळावर जाकिया वार्दक यांना ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी रोखले व त्यांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांच्याकडं कपड्यांमध्ये 25 किलो सोनं लपवल्याचं दिसून आलं. त्या सोन्याबाबत जाकिया समाधानकारक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. त्यामुळं ते सोनं पंचनामा करुन जप्त करण्यात आलं. अशा प्रकरणामध्ये तस्करी होत असलेल्या सोन्याची किंमत एक कोटीपेक्षा जास्त असल्यास संशयिताला अटक करुन त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 18 कोटी रुपये असल्यानं अशा प्रकरणांमध्ये तत्काळ आरोपीला अटक करण्याची तरतूद आहे. मात्र जाकिया या वाणिज्यदूत असल्यानं त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. त्यामुळं त्यांना अटकेपासून व कायदेशीर कारवाईपासून संरक्षण आहे. त्यामुळं त्यांची अटक टळली.
मुंबई विमानतळावर तपासणी…
दुबईवरुन मुंबईत येताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाकिया व त्यांच्या मुलाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जाकिया यांनी परिधान केलेल्या जॅकेटमध्ये, लेगिंगमध्ये, गुडघ्यावर लावलेल्या कॅपमध्ये, कमरेच्या पट्ट्यामध्ये अशा विविध ठिकाणी लपवलेलं तब्बल २५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. ‘डीआरआय’नं ही कारवाई केली होती. गेल्या आठवड्यात ही कारवाई करण्यात आली. मात्र, आता ही माहिती समोर आलीय.
आरोपांमुळं काम करण्यात अडचणी आल्याचा जाकिया यांचा आरोप….
“अफगाणिस्तानची महिला वाणिज्यदूत म्हणून जबाबदारी पार पाडताना आपल्याला जाणिवपूर्वक अडचण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. गेल्या वर्षभरात सुनियोजित पद्धतीनं आपल्यावर विविध आरोप करण्यात आले व त्रास देण्यात आला. सकारात्मक दृष्टीनं काम करण्यासाठी झगडणाऱ्या एका अफगाण महिला अधिकाऱ्याला किती अडचणींना सामोरं जावं लागलं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे,” अशी भूमिका जाकिया यांनी मांडली. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा प्रकारचे आरोप होणे हे मी समजू शकते. मात्र, माझ्या जवळच्या व्यक्तींवर व कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात देखील आरोप होत आहेत हे माझ्यासाठी पूर्णतः अनपेक्षित होते. त्यामुळं कंटाळून मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.