दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी राजापूर पोलिसांचे हातभार; डोंगर येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी!

Spread the love

खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकीचे दर्शन; पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे एकत्रित श्रमदानातून जलसंधारणाला बळ

राजापूर, ता. ३ : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट आतापासूनच लक्षात घेऊन राजापूर पोलिसांनी जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेतला आहे. मौजे डोंगर येथे राजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांनी ग्रामस्थांच्या साथीने श्रमदान करत वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमातून खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकीचे सकारात्मक दर्शन घडले.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर साठा निर्माण व्हावा, तसेच भूजल पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कायम राहावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. त्यासाठी पोलिसांनी केवळ आवाहन न करता प्रत्यक्ष कामात उतरून श्रमदान केले. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने बंधाऱ्याच्या उभारणीचे काम लोकसहभागातून पूर्णत्वास गेले.

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरण्यास चालना देणे आणि परिसरातील जलसाठा वाढविणे शक्य होते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अशा छोट्या जलसंधारण प्रकल्पांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. राजापूर पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.

या श्रमदान उपक्रमावेळी डोंगर गावच्या सरपंच सौ. जुबेदाबी मस्तान, ग्रामसेविका सौ. किनरे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गुरव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी (उन्हाळे), संदीप पवार, डोंगरचे पोलीस पाटील दीपक डोंगरकर, मुसलमानवाडीचे पोलीस पाटील सचिन कदम, दत्तवाडीचे पोलीस पाटील किरण कामतेकर, चौकेचे पोलीस पाटील श्री. तांबे, दोनीवडेच्या पोलीस पाटील सौ. करंगुटकर, विखारे गोठणेचे पोलीस पाटील संजय पावसकर यांच्यासह शामराव कदम, शंकर भुते, संदेश कदम आणि वसंत देवळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कायद्याच्या रक्षणासोबत समाजहिताचीही जपणूक

पोलीस दल म्हटले की कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी डोळ्यांसमोर येते. मात्र, या जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक प्रश्नांमध्येही पोलिसांनी पुढाकार घेतल्यास समाजाला मोठे बळ मिळू शकते, हे राजापूर पोलिसांनी कृतीतून दाखवून दिले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचविण्याचा आणि लोकसहभागातून जलसंधारण करण्याचा दिलेला हा संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page