नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेले ते 33% महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसने (Congress) प्रत्यक्षात मात्र महिलांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देताना मात्र हात आखडता घेतला आहे.
राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी फक्त 28 ठिकाणी काँग्रेसने (Congress) महिलांना उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या महिला आरक्षणाचे प्रमाण फक्त 14% आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत एकूण 1875 उमेदवार मैदानात आहेत. यात 1692 पुरूष आणि 183 महिला उमेदवारांचा समावेश आहे. यात कॉंग्रेसच्या (Congress) 28 आणि भाजपच्या 20 महिला उमेदवारांचा समावेश आहे. महिला उमेदवारांची आकडेवारी बघितली तर सहज लक्षात येईल की, महिला आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी पुढेपुढे करणाऱ्यांपैकी एकाही पक्षाने महिलांवर तुल्यबळ उमेदवारी दिलेली नाही. प्रामुख्याने कॉंग्रेस (Congress) आणि भाजपने महिलांना अपेक्षित प्रमाणात अशी उमेदवारी दिलेली नाही. अर्थात महिला आरक्षण लागू करण्यास वेळ लागेल, असे भाजपने आधीच जाहीर केले आहे. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 189 महिला उमेदवार मैदानात होत्या. यातील 24 महिला विजयी झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. आता फक्त 183 महिला मैदानात आहेत.