भारतीय समाजाला कमकुवत करून तसेच भारतात अराजकता पसरवून काँग्रेस देशाला कमकुवत करू इच्छित आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना अभिवादन करताना हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सत्तेची हॅट्ट्रीक साधली आहे. हरयाणात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीरमध्येही समाधानकारक कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार घणाघात केला. भारताची शांतता नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहेत, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे साथीदार या खेळात सामील आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
मोदी म्हणाले की, आज हरियाणाने काँग्रेसला स्पष्ट संदेश दिला आहे की, देशविरोधी राजकारण चालणार नाही. हरयाणातील प्रत्येक समाजाने, प्रत्येक कुटुंबाने एकजुटीने मतदान केले. देशभक्तीने भरभरून मतदान केले. हरयाणाने देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीचे कौतुक केले.
“जहा दूध-दही का खाना, वैसा है अपना हरियाणा”. हरयाणाच्या जनतेने चमत्कार केला आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे, माँ कात्यायनीचा दिवस. आई कात्यायनी हातात कमळ घेऊन सिंहावर बसली आहे. ती आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरयाणात तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे, असे मोदी यांनी पक्ष मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
हरयाणात खोटारडेपणावर विकासाची हमी मिळाली, राज्यात तिसऱ्यांदा निवडून आलेले सरकार म्हणून जनतेने नवा इतिहास लिहिला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –
१.राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. हरयाणाचा हा विजय जे.पी. नड्डा आणि हरयाणा टीमच्या प्रयत्नांचा विजय आहे. हरयाणाचा हा विजय म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाचाही विजय आहे.
2.काँग्रेसवर हल्ला चढवत मोदी म्हणाले की, “शेवटचे काँग्रेस सरकार कधी सत्तेवर आले होते? सुमारे १३ वर्षांपूर्वी २०११ मध्ये आसाममध्ये त्यांच्या सरकारने सत्ता कायम राखली होती. त्यानंतर जनतेने कोणत्याही राज्यात काँग्रेसला दुसरी टर्म दिली नाही.
3.हरयाणामध्ये भाजपच्या तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हरियाणामध्ये आतापर्यंत १३ निवडणुका झाल्या आहेत, त्यापैकी १० निवडणुकांमध्ये हरयाणाच्या जनतेने सरकार बदलले आहे परंतु यावेळी हरियाणाच्या जनतेने जे केले ते यापूर्वी कधीच झाले नाही. हरयाणामध्ये पहिल्यांदाच ५ वर्षांचा २ कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांना सरकार स्थापन करण्यात आले आहे.
4. देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रेसकडून भारतीय समाजाला कमकुवत करून आणि भारतात अराजकता पसरवून देशाला कमकुवत करायचे आहे, म्हणूनच ते विविध घटकांना चिथावणी देत आहेत. ते सतत आग पेटवण्याचा प्रयत्न करत असतात.
5.काँग्रेसवर शेतकऱ्यांना भडकावण्याचा आरोप करत मोदी म्हणाले की, “शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न कसा केला गेला हे देशाने पाहिले, परंतु हरयाणाच्या शेतकऱ्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले की ते देशासोबत आहेत, ते भाजपसोबत आहेत. दलित आणि ओबीसींना भडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण या समाजानेही हे षडयंत्र ओळखून आपण देशासोबत आहोत, भाजपसोबत आहोत, असे सांगितले.
6.भारताला लक्ष्य करण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. गेल्या काही काळापासून भारताविरोधात अनेक षड्यंत्रे रचली जात आहेत. भारताची लोकशाही आणि सामाजिक बांधिलकी कमकुवत करण्यासाठी अनेक षड्यंत्रे रचली जात आहेत. आंतरराष्ट्रीय कट रचले जात आहेत. काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष या खेळात गुंतलेले आहेत.
7.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज हरियाणाने अशा प्रत्येक षडयंत्राला सडेतोड उत्तर दिले आहे. असे कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, अशी शपथ प्रत्येक भारतीयाला घ्यावी लागेल. भारत विकासाच्या मार्गापासून विचलित होणार नाही.
8.पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीर निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्ये शांततेत निवडणुका झाल्या, मतमोजणी झाली आणि निकाल जाहीर झाले आणि हा भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा विजय आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेने नेकां आघाडीला जनादेश दिला, त्यांचेही मी अभिनंदन करतो. मतांची टक्केवारी पाहिली तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
9.काँग्रेसने दलित आणि मागासांवर खूप अत्याचार केले आहेत. गेली अनेक दशके दलित आणि मागास वर्ग रोटी, पाणी आणि मकान पासून वंचित होते. काँग्रेस कधीही दलित किंवा मागासांना भारताचा पंतप्रधान होऊ देणार नाही, कारण काँग्रेसचे कुटुंब दलित, मागास आणि आदिवासींचा द्वेष करते.
10.काँग्रेस भारताच्या संस्थांना बदनाम करण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.