बीड- माझ्या मतदार हाच माझा परिवार आहे. मतदारांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी मी निघालो आहे. ‘मेरा भारत, मेरा परिवार’ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास ते कलम 370, तिहेरी तलाक, किसान सन्मान निधी, रद्द करण्याची भाषा करत आहेत. इतकेच नाही तर अयोध्येतील राम मंदिर देखील ते कॅन्सल करण्याची भाषा करत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक देखील घेतली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. बीड लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर संदर्भात जो निर्णय दिला आहे, तो निर्णय आल्यानंतर राहुल गांधी यांनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेस सरकार आल्यास बदलणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. राजीव गांधी यांनी देखील या आधी असाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलला होता. त्यामुळे काँग्रेस राम मंदिराचा निर्णय देखील बदलणार असल्याची भाषा करत आहे. राम मंदिर बिनकामाचे असल्याचे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले होते. त्याच नेत्याने भगवान रामाच्या पूजेला पाखंड असल्याचे म्हटले होते. मात्र, इतर धर्मासाठी अशी भाषा बोलण्याची त्यांची हिंमत होत नसल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांची आठवण…
2014 साली मला मतदारांनी पहिल्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी मी देशभरातून गोपीनाथ मुंडे सारखे सहकारी सोबत घेतले होते. मात्र, दरम्यानच्या काळात मला गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर या सारख्या सहकाऱ्यांना गमवावे लागले, हे माझे दुर्भाग्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. माझे दोन्ही हात गेल्यानंतर माझ्यावर काय परिस्थिती आली असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा मोठा आघात होता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला.
काँग्रेस नेत्यांचे दहशतवाद्यांशी नाते काय?
काँग्रेस पक्षाच्या वतीने आता उघडपणे तुष्टीकरण करण्यात येत असल्यास आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांना क्लीन चीट देत आहेत. कसाब आणि पाकिस्तान मधून आलेले 10 दहशतवादी यांच्या सोबत काँग्रेस आपले नातेसंबंध जोडत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते आणि या दहशतवाद्यांचे नाते काय? असा प्रश्न देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. या आधी दहशतवाद्यांचे स्वागत पंतप्रधान यांच्या घरी होत होते, दहशतवाद्यांसाठी अश्रू काढले जात होते, असा आरोपही मोदींनी काँग्रेस पक्षावर केला.
धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव…
भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास बाबासाहेब आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला होता. सर्व संविधान सभेने एकत्र येत 75 वर्षांपूर्वीच धर्मा आधारीत आरक्षणाला विरोध केला होता. अनेक वेळा चर्चा करून संविधान सभेने हा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेस पक्षाच्या वतीने दलित समाज, आदिवासी समाज, आणि मागासवर्गीयांचे आरक्षण काढून ते आरक्षण धर्माच्या आधारावर देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्या राज्यात ओबीसीला 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र काँग्रेस सरकारने एका रात्रीत एक फतवा काढून कर्नाटक मधील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसीचा दर्जा दिला. त्याचा परिणाम झाल्याने ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणात एका रात्रीत मुस्लिम समाजाचा समावेश झाला. तर या माध्यमातून काँग्रेसने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डाका टाकला, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा मोठा भाग हा मुस्लिम समाजाच्या खात्यात गेला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मागील दारातून ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचे काम काँग्रेसने केला असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीच्या उमेदवारांसाठी आज प्रचार सभा घेतली. या सभेची बातमी देखील वाचा….
काँग्रेस नेते दहशतवादी कसाबची बाजू मांडत आहेत:वडेट्टीवारांच्या 26/11 विषयीच्या वक्तव्यावरुन नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घेरले…
काँग्रेसची बी टीम ॲक्टिव्ह झाली.असून सीमेच्या पलीकडून ट्विट केले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्या बदल्यात काँग्रेसचे नेते पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यातून क्लीन चीट देण्याचे काम करत आहेत. मुंबईमध्ये झालेला 26/11 चा हल्ला पाकिस्तान ने केलेला हल्ला होता. आपल्या जवानांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. हे सर्व जगाला माहिती आहे. न्यायालयाने देखील या विषयावर निर्णय दिला आहे. इतकच नाही तर पाकिस्तानने देखील दहशतवादी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. या दहशतवाद्यांचे फोन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. असे असताना काँग्रेस पक्षाचे नेते आता दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे . आता काँग्रेस पक्षातील नेते आतंकी कसाबची बाजू मांडत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.