मुंबई- मुंबईतील नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने इमारतीच्या १५ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. इमारतीवरून उडी मारल्यानंतर या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित किशोर गुरबानी (वय ३३वर्ष), असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत तरुण नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित २०१५ पासून नायर रुग्णालयात कामाला होता. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहित इमारतीच्या टेरेसवर गेला व त्याने खाली उडी मारली. त्याला तत्काळ रुग्णालयात नेले गेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. रोहितने १५ मजली इमारतीच्या छतावरून उडी मारलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राहुल गुरबानी याच्यावर मागील ७ ते ८ वर्षापासून सिझोफेनिया या आजारावर उपचार सुरू होते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी देखील त्याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास टोपाज या उंच इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. या आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,रोहितने आत्महत्या का केली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.