कणकवली/प्रतिनिधी:- कोकणातील 12 रेल्वे स्थानक सुशोभीकरण व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांचे ऑनलाईन भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.कणकवली रेल्वे स्थानकासाठी 6 कोटी निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे कणकवली येथे उपस्थित होते.
अमृत भारत योजनेच्या धर्तीवर आपल्या कोकण रेल्वेवरील प्रमुख १२ स्टेशनचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसंच अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सा. बां. विभागामार्फत तब्बल १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, समीर नलावडे, संजना सावंत, नासिर काझी, मनोज रावराणे, विठ्ठल देसाई, मिलिंद मेस्त्री, राजश्री धुमाळे, अबीद नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.