CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट:MVAचा फडणवीसांसह 4 BJP नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता; 16 जागा लढवणार…

Spread the love

मुंबई- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील 4 प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शिंदेंनी शिवसेना लोकसभेच्या 16 जागा लढवणार असल्याचेही संकेत दिलेत.

फडणवीसांना अटक करण्याचा डाव होता…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असताना मुख्यमंत्री एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्त दावा केला आहे. शिंदे म्हणाले की, मविआ सरकारने देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन आखला होता असा दावा चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला आहे. माझ्या माहितीनुसार ठाकरे सरकार सत्तेत असताना केवळ फडणवीसच नव्हे तर गिरीश महाजन, आशिष शेलार व प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता. एवढेच नाही तर 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार फोडून त्यांना आपल्या गोटात घेण्याचा डावही त्यांनी आखला होता.

शिवसेना 16 जागा लढवणार..

एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेच्या 16 जागा लढवणार असल्याचाही दावा केला. शिवसेना राज्यातील 16 जागांवर लोकसभेची निवडणूक लढेल. त्यात मुंबईतील 3 जागांचा समावेश असेल. जागावाटपावरून महायुतीत कोणतेही मतभेद नसून, आम्ही विकासाच्या मुद्यावर प्रचार करून 42 जागा जिंकण्याचा 2019 चा विक्रम मोडीत काढणार आहोत, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला असला तरी महायुतीचे जागावाटप अद्याप ठरले नाही. भाजपने मुंबईतील ईशान्य मुंबई व उत्तर मुंबई या 2 लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर केलेत. तर शिंदेंच्या शिवसेनेने केवळ दक्षिण मध्य मुंबई या एका मतदार संघात उमेदवार घोषित केला आहे. महायुतीचे मुंबईतील 3 जागांवरील उमेदवार घोषित करणे अद्याप बाकी आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत राज्यातील 11 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. शिंदेंच्या दाव्यानुसार शिवसेनेने आणखी 5 जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले तर हा आकडा 16 वर जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना मुंबईतील 2 जागांसह ठाणे, पालघर व नाशिक या जागांचा समावेश असेल. त्यामुळे साहजिकच भाजप 27, शिवसेना 16 व राष्ट्रवादी काँग्रेस 5 असे जागावाटप असेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page