राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन
रत्नागिरी- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस तसेच स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. स्वच्छ परिसरामुळे व्यक्तीचे मन आणि विचार देखील स्वच्छ राहतात. या स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, ते सर्वांनी ठेवावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहित सैनी यांच्यासह माजी सभापती कुमार शेट्ये, सुधाकर सावंत, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सुभाष पाटील आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे, तहसीलदार श्री. म्हात्रे, नेहरु युवा केंद्राचे श्री. सैनी यांनीही प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी व्यसनमुक्तीची शपथ उपस्थित सर्वांना दिली. मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या शालेय जीवनातील स्वच्छते विषयक प्रसंग सांगून ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे महत्व आपणा सर्वांना सांगितले आहे. शालेय जीवनात शिक्षकांनी सांगितलेले स्वच्छतेचे महात्त्व आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक व्यक्तींने आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्याचे मन आणि विचार देखील स्वच्छ बनतील. या स्वच्छतेमध्ये कायम सातत्य असावे. त्यामुळे परिसर, आपले गाव आणि पर्यायाने आपला देश स्वच्छतेत अग्रेसर असेल. ज्या पध्दतीने आपल्याकडील वाहनाचे सर्व्हीसींग करण्यात आपण सतर्क असतो.
त्याच पध्दतीने आपण आपल्या आरोग्याची देखील तपासणी करुन घेतली पाहिजे. त्यामुळेच आपण वेळीच सावध होऊन उपचार घेऊ शकतो आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करु शकतो. पोलीस अधीक्षक श्री. कुलकणी म्हणाले, महात्मा गांधीजींचे स्वच्छते विषयीचे विचार आपल्या आचरणात कसे येतील, या विषयी आपण काळजी घेतली पाहिजे. वैचारिक स्वच्छतेकडेही लक्ष देऊन आपल्या विचारांची स्वच्छता कशी राहील याकडेही लक्ष दिले पाहिजे.
सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असे नाही, त्यामुळे ती पुढे पाठविताना शंभर वेळा विचार करावा. स्वच्छतेचा हा उपक्रम चळवळ म्हणून वाढविला पाहिजे, असेही ते म्हणाले. स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्राच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर जयंती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.