
कोकणातून पहिली सुकन्या म्हणून डॉक्टर ऑफ फार्मास्युटिक्सचा सन्मान
चिपळूण, ता. २६ : चिपळूणची कु. भक्ती मानसी महेंद्र पवार हिने अहमदाबाद येथील देशपातळीवर ख्याती प्राप्त NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) या संस्थेतून Pharmaceutics या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून Doctorate हा बहुमान प्राप्त केला आहे. कोकणातून या नामवंत संस्थेतून पीएच.डी. मिळवणारी ती पहिलीच सुकन्या ठरली आहे.
आपल्या अथक परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवादी प्रवृत्तीच्या बळावर तिने ही यशशिखराची कामगिरी गाठली आहे. चिपळूण आणि संपूर्ण कोकणासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून तिच्या या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याबाबत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्यातर्फे विश्वस्त श्री. समीर शेट्ये यांनी कु. भक्ती पवार हिचा सन्मान करून हार्दिक अभिनंदन व्यक्त केले. तसेच तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत श्रींचा सन्मानपूर्वक प्रसाद प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी तिचे वडील श्री. महेंद्र मारुती पवार, आई सौ. मानसी महेंद्र पवार, श्री. नितीन रामराव कदम, सौ. नेहा नितीन कदम, श्री. प्रभाकर अमृतराव सुर्वे, स्वाती दीपक वारे, श्री. दिगंबर प्रभाकर सुर्वे, सौ. दीप्ती दिगंबर सुर्वे, श्री. पराग सुरेश पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
कु. भक्तीचे यश हे आजच्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारे असून तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत.