शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या सामन्यात चिपळूण इलेव्हन संघाने ‘तेली प्रीमियर लीग’ चषकावर कोरले नाव..

Spread the love

गुहागर तालुका तेली समाज सेवा संघातर्फे आयोजन; कालिकामाता धोपावे संघ उपविजेता

काजुर्ली गुहागर I सुयोग पवार ✍️

गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने दिनांक ११ व १२ मे रोजी पोलीस परेड ग्राउंड, गुहागर येथे ‘तेली प्रिमीअर लीग २०२४’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच तेली प्रिमीअर लीग होती. या जिल्हास्तरीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील एकूण दहा संघांनी व १५४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तेली समाजातील क्रिकेट खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे तसेच क्रिकेट स्पर्धेतील नवीन प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने व्यावसायिक स्पर्धेप्रमाणे या लीगचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः स्पर्धेच्या पंधरा दिवसापूर्वी खेळाडूंची संघ निवड (ऑक्शन) सोहळा ड्रॉ पद्धतीने सिद्धीविनायक रिसॉर्ट, वरवेली – गुहागर येथे पार पडला. त्यानंतर स्पर्धेच्या आठवडाचा कालावधी असताना स्पर्धेतील “तेली चषक व खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण समारंभ” विशाल बोटिंग क्लब, मोडकाआगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना स्मरणिका वॉरीअर्स अडूर विरुद्ध चिपळूण इलेव्हन यांच्या मध्ये झालेल्या सामन्यात सांघिक खेळाच्या जोरावर चिपळूण इलेव्हन संघाने बाजी मारली. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना कालिकामाता धोपावे संघांने कै.संदेश इलेव्हन संघ पाथर्डी यांच्यावर मात करीत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत झालेल्या चिपळूण इलेव्हन विरुद्ध कालिकामाता धोपावे संघा दरम्यान शेवटच्या चेंडू पर्यंत रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. चार षटकामध्ये ५१ धावांचे अशक्य उदिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या चिपळूण इलेव्हन संघांच्या अक्षय करळकरच्या आक्रमक फलंदाजीने धावसंख्या नियंत्रणात ठेवण्यास यश मिळाले. मात्र मोक्याच्या क्षणी झटपट दोन विकेट गमावल्याने सामना कालिकामाता धोपावे संघाकडे झुकताना दिसत होता. परंतु शेवटच्या दोन चेंडूवर चिपळूण इलेव्हन संघाच्या संतोष करळकरने केलेल्या स्फोटक फलंदाजीने ‘तेली प्रिमीअर लीग २०२४’ या चषकावर मोहोर उमटविली. यावेळी स्पर्धेतील धोपावे संघाचा सौरभ पवार याला मालिकावीर घोषित करण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय करळकर, उत्कृष्ट गोलंदाज विनायक जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज रहाटे व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संतोष करळकर यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी, सौ.जयश्री वैरागी, माजी आमदार विनय नातू, भाजपाचे ओबीसी सेल मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, युवा उद्योजक व गोल्डन मॅन वैभव दादा रहाटे, कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, दिनेश नाचणकर, दत्ताशेठ रहाटे, चिपळूण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण (बापू) राऊत, कोकण विभागीय महिला अध्यक्ष प्रियंका भोपाळकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेयाताई महाडिक, गुहागर महिला तालुकाध्यक्ष दिव्या किर्वे, उद्योजक महेश राऊत, गोवर्धन महाडीक, गुहागर तालुकाध्यक्ष प्रकाश झगडे व सर्व आजी माजी पदाधिकारी व समस्त ज्ञाती बांधव यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवक कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page