श्रीकृष्ण खातू /धामणी – सहामाही परीक्षा संपल्यावर लगेचच दिवाळी सणाची सुट्टी सुरू होते. चार महिने पावसाच्या वातावरणातून बाहेर पडल्यानंतर अगदी मनमुराद गुलाबी थंडीचा आनंद घ्यावा ,
,व विविध उपक्रमांची मजा घेण्यासाठीच ही जणू दिवाळीची सुट्टी!
अशा सुट्टीतून काही गोष्टी व रूढी परंपरा जतन करावी, व लढाऊवृत्ती न्यून न होता येणाऱ्या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण बाल वयापासूनच व्हावे, यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्याची सिंहासनावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रूजवण्याच्या हेतूने संगमेश्वर तालुक्यातील धामणी पाष्टेवाडी व काकडवाडी येथील बाल गोपाळानी सिंहगडाची प्रतिकृती तयार केली.
साधारणपणे फटाके वाजविणे, फराळाचा आस्वाद घेणे, पाहुणचार घेणे, व सुट्टीतील थोडा फार अभ्यास करणे, अशा गोष्टी ठरल्याप्रमाणे मुले करतच असतात. परंतु यापेक्षा वेगळे काही करावे अशा विचारांनी येथील मुलांनी शिवरायांवरील प्रेम, व गड किल्ल्यांच्या बांधकामाविषयी थोडे ज्ञान व श्रमयुक्त आनंद मिळावा , म्हणून गणपती मंदिर आवारात आठ दिवस मेहनत करून सुंदर सिंहगड किल्ला प्रतिकृती तयार केली. त्यासाठी दगड माती, मावळे, राहूट्या, दरवाजे, झेंडे, यांचा योग्य वापर करून तयार झालेला किल्ला सर्वांचेच आकर्षण ठरला आहे.
यासाठी मोठ्या उत्साहाने रोशन पाष्टे, गौरव पाष्टे, कौस्तुभ विलणकर, सुजल वनये, आयुष मेस्त्री, कार्तिक विलणकर, अभी मेस्त्री, जिग्नेश पाष्टे, मयुरेश पाष्टे सानिका वनये, शर्वरी काकवळ, अमित सपकाळ,रोहन पाष्टे, जितेंद्र काकवळ, वृषभ साळुंके, यांनी सुधीर पाष्टे व सिताराम करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पूर्ण केला आहे.