छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा, आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

Spread the love

आदिवासी नेते विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर सर्व आमदारांचं एकमत झालं….

रायपूर- भारतीय जनता पार्टीनं छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्याची घोषणा केली आहे. पक्षानं विष्णुदेव साय यांना राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. रविवारी (१० डिसेंबर) रायपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बेठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या बैठकीला केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपाचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते.

केंद्रीय नेतृत्वाची पसंती….

विष्णुदेव साय हे आदिवासी समाजातून येतात. छत्तीसगडमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं देशभरात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांनुसार, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यावर सर्व आमदारांचं एकमत झालं. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांचं नावही आघाडीवर होतं. तसेच अरुण साव, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह यांच्या नावांची देखील चर्चा होती. मात्र केंद्रीय नेतृत्वानं विष्णुदेव साय यांना पसंती दिली.

कोण आहेत विष्णुदेव साय…

विष्णुदेव साय हे कुनकुरी मतदारसंघातून आमदार निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उद मिंज यांचा पराभव केला. विष्णुदेव यांना ८७६०४ तर उद मिंज यांना ६२०६३ मतं मिळाली. विष्णुदेव साय छत्तीसगड भाजपाचे अध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय ते रायगड मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत. नुकत्याचं झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपानं सत्ताधारी काँग्रेसला जोरदार धक्का देत ९० पैकी ५४ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ ३४ जागांवर समाधान मानावं लागलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page