
लखनऊ – समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबचे कौतुक करत वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले. महाराष्ट्र विधानसभेसह उत्तर प्रदेशातील विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून वाद दिसून आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नाव न घेता अबू आझमी यांच्या जोरदार हल्ला चढवला. त्या कमबख्तला एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही त्यांचा उपचार करु, असे आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी सभागृहात बोलताना समाजवादी पार्टीवर जोरदार हल्ला चढवला.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्षाचे एक नेते आहेत. त्या कमबख्तला औरंगजेब आवडतो. तो औरंगजेबाला आपला आदर्श मानतो. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्याला पक्षातून काढून टाका. समाजवादी पार्टीने त्यांच्या विधानाचे खंडन करावे. आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेले योगी म्हणाले, अशा लोकांना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्याचा चांगला उपचार करू. उत्तर प्रदेशात अशा लोकांच्या उपचारात कोणताही विलंब होत नाही, असा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला.
सपाचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही…
योगी आदित्यनाथ एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, समाजवादी पक्ष औरंगजेबाला नायक मानतो. समाजवादी पक्षाचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही. औरंगजेबाने भारताच्या श्रद्धेवर हल्ला केला होता. सपाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही. किमान ज्यांच्या नावाने ते राजकारण करतात त्यांचे तरी त्यांनी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचे आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्याने औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे.
औरंगजेब भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता…
योगी म्हणाले की, औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत. तुम्ही जाऊन शहाजहानचे चरित्र वाचावे. औरंगजेब भारताच्या श्रद्धेवर हल्ला करणार होता. तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता. कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही.
सपाला दिला शहाजहानचे चरित्र वाचण्याचा सल्ला…
योगी आदित्यनाथ औरंगजेबाच्या इतिहासाचा उल्लेख करताना म्हणाले की, त्याने त्याचे वडील शहाजहानला आग्रा किल्ल्यात कैद केले होते आणि त्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसले होते. सपा नेत्यांना पाटणा ग्रंथालयातील शहाजहानचे चरित्र वाचावे, असा सल्लाही आदित्यनाथ यांनी दिला. शहाजहानने औरंगजेबाला म्हणाला होता की, जो हिंदू जिवंतपणी आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर वर्षातून एकदा श्राद्ध करतो आणि आपल्या आईवडिलांना पाणी अर्पण करतो तो तुमच्यापेक्षा चांगला आहे. ज्यांचे आचरण औरंगजेबासारखे आहे त्यांना याचा अभिमान वाटू शकतो, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली.