लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार सर्वश्री सतिष चव्हाण, विक्रम काळे, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, व इतर मान्यवर उपस्थित होते.

लाडकी बहिण योजनेचे पंतप्रधानांकडून कौतुक…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कृषीपंपांसाठी शून्य वीज बिलामुळे शेतकऱ्यांना लाभ…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जवळपास ४५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. यामधून प्रशिक्षण काळात त्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून यामधून उभ्या राहणाऱ्या उद्योगांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना विविध उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयेपर्यंत सहाय्य करण्यात येणार आहे.

शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार…

प्रधानमंत्री मोदी यांनी ठाणे आणि मुंबईतल्या ३३ हजार कोटींपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजायला सुरुवात झाली आहे. टोयाटो किर्लोस्करचा २० हजार कोटींचा प्रकल्प तिथे होत आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या ठरल्या असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाला विकासाकडे नेण्यासाठी महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यानुसार महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाने महिलांसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओपासून ते लखपती दीदी सारख्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा केले जात आहेत. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना बंद होणार असलाचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे, मात्र यापुढेही ही योजना अशीच सुरु राहील, असा विश्वास फडणवीस यांनी दिला.

दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यास मंजूरी…

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुढील काही वर्षात हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर होईल. साडेसात एचपी पर्यंतच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना शून्य रक्कमेची वीज बिले वाटप सुरु झाले आहे. या योजनेची रक्कम शासनाने महावितरणला जमा केली आहे. आता पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य बनले आहे, असा उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत कालच ५ सौर कृषी वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषीपंप देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये सौर कृषीपंपाची ९० टक्के रक्कम राज्य शासन भरणार असून १० टक्क्के रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल. राज्यात आतापर्यंत ६० हजार सौर कृषिपंप लावण्यात आले असून यापैकी सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद- उपमुख्यमंत्री अजित पवार..

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यावर ओवाळणीची रक्कम जमा करण्यात आली होती. आता दिवाळीपूर्वीच म्हणजेच याच आठवड्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या रक्कमेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होईल, असे पवार म्हणाले.

राज्य सरकाने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य केले असल्याचेही सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना चालू वीज देयकाच्या पावत्यांचं वितरण आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ अंतर्गत आस्थापित कृषी पंपांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं राज्य शासनाने ठोस पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजनेतून, राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांच्या साडेसात एचपी पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेसाठी आपण १४ हजार ७६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही महत्त्वाची योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील राबवण्यात येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात यश आले आहे. २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात १० हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात ५०० ते १ हजार रिक्षा देण्यात येत आहेत. पुढे हेच उदिष्ट २ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

विविध योजनांचे लोकार्पण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यामध्ये मोफत वीज बील योजना, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, पिंक ई रिक्षाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागातील चांगल्या कार्याबद्दल विभागीय आयुक्त् दिलीप गावडे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभाग यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page