आज बाळासाहेब असते तर त्यानी मोदीना शाबासकी दिली असती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन…

Spread the love

▪️मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त फोर्ट येथील रीगल सिनेमा चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याला वंदन केलं.

त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. तसेच बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं. बाळासाहेबांनी मोदींचं अभिनंदन करुन शाबासकी दिली असती, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केली.

“राज्यात सर्व घटकांना, सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आपण करतोय. या राज्याच्या सर्वांगिण विकासाचं काम आपण करतोय. राज्यात बंद पडलेले प्रकल्प आपण करतोय. आपण नवीन प्रकल्प सुरु केले. नवीन योजना सुरु केल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही अशाप्रकारचे निर्णय घेतो”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

▪️बाळासाहेबांनी मोदींचं कौतुक केलं असतं’

“अयोध्येत लवकरच राम मंदिराचं उद्घाटन होतंय. तेही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राम मंदिराचं उद्घाटन होतंय. हा देखील योगायोग आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की, अयोध्येत राम मंदिर व्हावं, तसंच लाखो, कोट्यवधी रामभक्तांचं देखील स्वप्न होतं की, अयोध्येत राम मंदिर व्हावं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रामभक्तांचं हे स्वप्न पूर्ण करत आहेत. खरं म्हणजे यावर्षाची खरी श्रद्धांजली ही बाळासाहेब ठाकरेंना ठरेल. बाळासाहेब ठाकरे आज असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी अभिनंदन केलं असतं. त्यांना शाबासकी दिली असती”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

▪️त्यांना खरंतर तिथे येण्याची आवश्यकता नव्हती’

यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला कुठलाही वाद, संघर्ष याचं गालबोट लागू नये म्हणून मी स्वत:, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते कालच स्मृतीस्थळावर गेलो. तिथे नतमस्तक झालो, दर्शन घेतलं. आम्ही तिथून निघालो. आमची लोकं दर्शन घेऊन निघत होते त्यावेळी ठाकरे गटाचे लोक तिथे आले आणि त्यांनी गालबोट लावण्याचं काम केलं. त्यांना खरंतर तिथे येण्याची आवश्यकता नव्हती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी आजही तिथे मुख्यमंत्री म्हणून दर्शनाला जाऊ शकलो असतो. आमचे कार्यकर्तेही जाऊ शकले असते. पण वाद नको. चांगल्या कार्यक्रमामध्ये गालबोट नको. बाळासाहेबांना न आवडणाऱ्या या गोष्टी आहेत. काल जे घडलं ते अतिशय दुर्देवी प्रकार होता. मी कालच त्याचा निषेध केलाय. आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलंय. बाळासाहेबांची शिकवण आचरणात आणण्याचं आम्ही काम करतोय. त्यांनी 2019 च्या निवडणुकीला सत्तेची खुर्ची मिळवली तेव्हाच बाळासाहेबांचे विचार गमावले. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page