विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं सुटणार आहेत.
मुंबई : मुंबईकरांनो, रविवारी लोकलनं प्रवास करणार असाल तर जरा थांबा. ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक तपासून पुढचं नियोजन करा. कारण आज मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेनं तांत्रिक कामांसाठी आजचा ब्लॉक घेतल्याचं जाहीर केलं असून, मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं सुटतील.
तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक : मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, आजचा ब्लॉक हा तांत्रिक कामांसाठी घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्या विहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.24 पर्यंत सुटणारी डाऊन स्लो सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
घाटकोपरहून सकाळी 10.41 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ठाण्याला जाणारी लोकल डाऊन स्लो सकाळी 10.18 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल. ब्लॉकपूर्वीची ही शेवटची लोकल असेल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
नियोजन करुनच घराबाहेर पडा : हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान बंद राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहतील.