श्रीहरीकोटा- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चांद्रयान ३ ने आज शुक्रवारी दुपारी २.३५ मिनीटांनी आकाशात झेप घेतली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे चांद्रयान 3 यान प्रक्षेपित करण्यात आलं आहे.
चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेल्या इस्रोच्या टीममध्ये महिला शास्त्रज्ञ रितू करिधाल यांचाही समावेश आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी त्यांच्यावर आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ रितू करिधाल या चांद्रयान-3 च्या मिशन डायरेक्टर आहेत. गेल्या काही दिवसांपासून रितू करिधाल या चांद्रयान मोहिमेमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. चांद्रयान मोहिमेची खूपच मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. याआधी रितू करिधाल या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या
रितू करिधाल या लखनऊ विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या लखनऊच्या राजाजीपुरम येथील रहिवासी आहेत. रितू यांनी शालेय शिक्षण लखनऊच्या नवयुग कन्या महाविद्यालयातून पूर्ण केले. 1991 मध्ये त्यांनी लखनऊ विद्यापीठातून बीएससी फिजिक्स या विषयात शिक्षण घेतले. 1996 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यांना लहानपणापासूनच अवकाश भौतिकशास्त्रात रस होता. त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडीसाठी प्रवेश घेतला. परंतु 1997 मध्ये 6 महिन्यांच्या आत त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये निवड झाली. इस्रोमध्ये निवड झाल्यानंतर त्यांना पीएचडीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.
इस्रोने चांद्रयान-3 लँडिंगची जबाबदारी रितू करिधाल यांच्या हातात दिली आहे. रितू यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शास्त्रज्ञ हे मिशन यशस्वी करण्यात गुंतले आहेत. त्या मिशनच्या डायरेक्टरची भूमिका साकारत आहेत. रितू या मंगलयान मिशनच्या ऑपरेशन डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. रितू करिधाल यांनी इस्रोमध्ये इतर अनेक भूमिका साकारल्या आहेत. एरोस्पेसमध्ये तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या रितू यांनी चांद्रयान-2 मिशनमध्ये मिशन डायरेक्टरची जबाबदारीही सांभाळली आहे. कामाच्या आवडीमुळेच त्यांनी इस्रोमध्ये आपला ठसा उमटवला आहे. इस्रोमधील विविध मोहिमांमध्येही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. रितू यांना त्यांच्या उल्लेखनीय कामांसाठी ‘रॉकेट वुमन’ म्हणूनही ओळखले जाते. रितू करिधाल यांना 2007 मध्ये? यंग सायंटिस्ट अवॉर्डही मिळाला आहे. रितू यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट अवॉर्ड, मार्स आर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अवॉर्डही मिळाला आहे. सध्या चांद्रयान 3 मोहिमेवरुन त्या चर्चेत आहेत.