पुणे- राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील दोन दिवसांत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज आणि पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने १२ ते १५ तारखेपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना यलो तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात १३ ते १५ जुलै रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरात ते केरळच्या समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज पासून पुढील ३ दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक ११ जुलै रोजी पालघर येथे तर १२ जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व पुणे सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात, तर १३ जुलै रोजी संपूर्ण कोकणात व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तर दिनांक १४ जुलै व १५ जुलैला रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११६ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
दिनांक १२ जुलैला ठाणे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याच्या घाट विभागात तर पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग व नाशिक कोल्हापूरच्या घाट विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १४ व १५ जुलैला पालघर, ठाणे, मुंबई येथे तुरळक ठिकाणी जोरदार म्हणजेच २४ तासात ६५ मिलिमीटर ते ११५ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यात मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे शहर व परिसरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार म्हणजेच २४ तासात ६५ मिलीमीटर ते ११५ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.