
प्राचार्य डॉ. राहूल जाधव व डॉ. अशोक साळुंखे
मंडणगड /प्रतिनिधी- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘‘मराठी भाषा गौरव दिन’’ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव तर प्रमुख मार्गदर्शक मराठी विभागप्रमुख म्हणून प्रा. संजयकुमार इंगोले होते. यावेळी डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापूरे, डॉ. विष्णु जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. अशोक साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा संजयकुमार इंगोले यांनी मराठी भाषा टिकविण्यासाठी आपल्या सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असून त्यादृष्टीने मराठी भाषेचा वापर केल्यास आपली मराठी भाषा ज्ञानभाषा होऊ शेकेल. तसेच अभिजात भाषेची संकल्पना, मराठीपूर्वी अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा , अभिजात मराठी भाषा समितीचे कार्य, अभिजात भाषा समितीचा अहवाल, अभिजात मराठी भाषा समितीच्या अहवालाबाबतचे मतभेद, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने होणारे लाभ या मुद्दयांच्या अनुशंगाने ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयाची मांडणी केली व प्रत्येकाने मराठी भाषेचा आदराने व अभिमानाने वापर करावा असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की, जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे, संगणक व इतर तांत्रिक क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढला तर मराठी भाषा माहितीची व ज्ञानाची होईल. इतर भाषेचा व्देश न करता आपण आपल्या भाषेचा वापराचा आग्रह धरला पाहिजे, त्याकरिता आपण सार्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक सहाय्यक म्हणून प्रा. सुरज बुलाखे यांनी काम पाहिले.
सदर कार्यशाळेस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. विष्णु जायभाये, डॉ. सूरज बुलाखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक साळुंखे यांनी तर आभार डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले.