
मंडणगड (प्रतिनिधी): येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, करिअर प्लेसमेंट सेल व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अकाऊंट व टॅक्सेशन मधील रोजगार संधी” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ अकाऊंट ऑन्ड टॅक्सेशन या संस्थेतील लेखापाल श्री. राजेंद्र डांगे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी डॉ. विनोद कुमार चव्हाण, डॉ. ज्योती पेठकर, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. प्रीतेश जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. राम देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उदे्दश स्पष्ट केला.
यावेळी श्री. राजेंद्र डांगे त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की अकाऊंट व टॅक्सेशन विभागातील रोजगाराच्या संधी व बाजारपेठेतील मागणी ही आकडेवारी स्पष्ट करताना या क्षेत्रात असलेल्या संधी, जॉब, सुरक्षितता व आदर या वैशिष्ट्यांना त्यांनी अधोरेखित केले. या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक कौशल्ये कोणती आहेत याचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. बदलत्या काळाची गरज म्हणून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक कौशल्ये म्हणजे सर्वकश ज्ञान, या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग म्हणजेच प्रात्यक्षिक ज्ञान तसेच सॉफ्ट स्किल म्हणजेच आत्मविश्वास, प्रेझेंटेशन स्किल याच बरोबर टेक्निकल स्किल, मॅनेजमेंट स्किल या कौशल्यांची नितांत गरज आहे हे सांगितले. तसेच असे शिक्षण देणाऱ्या संस्थांची नावे,संपर्क यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. ज्योती पेठकर यांनी मानले.