
माणगाव- रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात कार व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की खेड- चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती. तर कार माणगाव दिशेकडे येत होती. उतार व वेग असल्यामुळे तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्वीट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्टच्या चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली जेष्ठ महिला यांचा मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमाने अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु केले.
कारमधील तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी मध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर एसटी मधील कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. राठोड व पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले. तसेच येथील तुषार कदम व राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलीस कर्मचारी हे देखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहचले.