रत्नागिरी:- जिल्ह्यातील मच्छीमार नौकांची व्यापक तपासणी मोहीम नुकतीच पूर्ण झाली. जिल्ह्यातील १ हजार ४७३ यांत्रिकी मासेमारी नौकांपैकी १ हजार १६४ नौकांकडे आवश्यक कागदपत्रे आढळून आली. त्या शासनाच्या डिझेल परताव्यास पात्र ठरल्या आहेत; मात्र ३०९ नौकाधारकांकडे आवश्यक कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे त्या नौकांना डिझेल परतावा यादीतून वगळण्यात आल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच डिझेल नौकांची पडताळणी सुरू केली. गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. मोहिमेत ठिकठिकाणी परवाना अधिकाऱ्यांनी बंदरावर गस्त घालून तपासणी मोहिमेत सहभाग घेतला. मच्छीमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी व बंदर परवान्यासह अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये वैध कागदपत्रे तसेच नौकेची रास्त परिस्थिती लक्षात घेऊन प्रमाणीकरण करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ४७३ डिझेल यांत्रिकी नौका असून, त्यापैकी १ हजार १६४ नौकांकडे साऱ्या बाबी यथायोग्य आढळल्याने त्यांना शासनाकडून येणारा डिझेल परतावा देण्यात येणार आहे. उर्वरित ३०९ नौकाधारकांकडे वैध कागदपत्र अथवा नौकेशी योग्य परिस्थिती न आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. पडताळणीमुळे ही कार्यवाही शक्य झाली. ही मोहीम येथून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त पालव यांनी दिली.