दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; फेक कॉल करणारा अटकेत ….

Spread the love

दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देणाारा कॉल पोलिसांना आला होता. हा कॉल फेक असल्याचं आता उघड झालंय. फेक कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय.

मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारं तसंच वर्दळीचं स्थानक म्हणूनही दादर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. हेच रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देणाऱया धमकीचा एक कॉल नागपूर पोलिसांना आला होता. नागपूर पोलिसांनी लगेच याची माहिती मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना दिली.

आरोपी अटकेत….

दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉलनं देण्यात आली होती. दादर रेल्वे स्थानकावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं हा धमकीचा कॉल येताच एकच खळबळ उडाली. धमकीचा कॉल येताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीनं बीडीडीएस पथकासह दादर रेल्वे स्थानकावर कसून तपासणी केली. मात्र, कुठंही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. दरम्यान, हा धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचाही पोलिसांनी शोध घेतलाय.

पोलिसांनी दिली माहिती…

बॉम्ब ठेवून दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपीस अटक करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलंय. विकास उमाशंकर शुक्ला (वय- ३५) असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

असा आहे घटनाक्रम….

29 मार्चला रात्री 11 वाजताच्या सुमारास अनोळखी मोबाईल नंबरवरुन मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूम क्रमांक ११२ येथे कॉल करुन दादर रेल्वे स्थानक व कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवुन देण्याची धमकी दिली. सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेवुन रात्रपाळीचे अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास पेल्हार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सूचना देवुन धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत बिलालपाडा, धानिवबाग, वनोठापाडा याठिकाणी आरोपीचा शोध घेतला. तसंच तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन आरोपी विकास उमाशंकर शुक्ला याला ताब्यात घेण्यात आलं व नंतर त्याला अटक केली. विकास शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील राहणारा आहे. तो सध्या नालासोपारा पूर्व येथे राहतो.

BDDS नं केली तपासणी….

मायानगरी मुंबईत मागील काही वर्षांपासून अशा प्रकारच्या धमकीचे कॉल सतत येत आहेत. आताही विकास शुक्ला नावाच्या व्यक्तीनं कॉल करून दादर रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिली. या धमकीच्या कॉलनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. ‘बीडीडीएस’ पथकानं दादर रेल्वे स्टेशनचा कानाकोपरा तपासून काढला. मात्र, कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळं प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल….

आरोपी विकास शुक्लाची अधिक चौकशी केली असता, त्यानेच दोन्ही कॉल करुन मोबाईल बंद केला असल्याचं सांगितलं. त्याने ठाणे आणि मुंबई पोलीस कन्ट्रोलला देखील धमकीचे कॉल केले असल्याचे समजले. या आरोपीविरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ५०५ (१) (ब), ५०५ (२), १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

दादर रेल्वे स्थानक हिट लिस्टवर….

दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा कॉल जून 2023 मध्येही आला होता. याप्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस देखील मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाची तपासणी केली होती. तपासणीत बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page