हैदराबादमध्ये 8 तासांच्या छाप्यानंतर ईडीची कारवाई, त्यांना दिल्लीला नेले जाणार…
हैदराबाद- दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आणि आमदार के. कविता यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणू शकते. बीआरएस नेत्या कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला.
कविता यांनी तपास यंत्रणेच्या अनेक समन्सकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या (MLC) सदस्य आहेत आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.
मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी अमित अरोरा याने कवितांचे नाव घेतले होते…
मार्च 2023 मध्ये, ED ने दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के. कविता यांचे नाव देखील समाविष्ट केले होते. ईडीने तपासासंदर्भात काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. त्यात कवितांचेही नाव होते. ‘आप’च्या नेत्यांना 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर कविता यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, निवडणूक राज्यांमध्ये ईडी पंतप्रधान मोदींच्या आधी पोहोचते.
ईडीने व्यापारी अमित अरोरा यांना गुरुग्राममधून अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अमित अरोरा यांनी आपल्या जबाबात टीआरएस नेत्यांचे नाव उघड केले होते. एजन्सीने दावा केला होता की कविता या ‘साउथ ग्रुप’ नावाच्या मद्य लॉबीची प्रमुख नेता होत्या. त्यांनी दिल्लीतील आप सरकारच्या नेत्यांना इतर उद्योगपतींमार्फत 100 कोटी रुपये दिले.
ईडीने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना ताब्यात घेतले होते. अरुण हे के कविता यांच्या जवळचे मानले जातात. पिल्लई यांच्यावर मद्य धोरणात बदल करण्यासाठी 100 कोटी रुपये आम आदमी पार्टीला पाठवल्याचा आरोप आहे. आणखी एक मद्य व्यावसायिक अमनदीप ढाल यांनाही ईडीच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली होती…
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. 7 दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर, 6 मार्च रोजी न्यायालयाने सिसोदिया यांना 20 मार्च (14 दिवस) पर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. नवीन मद्य धोरण बनवण्यासाठी दक्षिण दिल्लीतील व्यावसायिकांकडून 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे ईडीने म्हटले होते.