लंडन- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज सोमवारी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली. भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पोलिसांवरील टीका भोवली असून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जेम्स क्लेवर्ली यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पंतप्रधान सुनक यांच्याकडून नव्या गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या सर्व राजकीय घडामोडीनंतर ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे डेव्हिड कॅमेरन यांची सात वर्षांनी राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. तर जेम्स क्लेवर्ली यांची गृहमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली आहे
परराष्ट्र मंत्री करण्यात आल्यावर कॅमेरून म्हणाले की, पंतप्रधानांनी मला त्यांचा परराष्ट्र मंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे आणि मी ते मान्य केले आहे. युक्रेनमधील युद्ध आणि मध्यपूर्वेतील संकट यासह आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, “मी गेली सात वर्षे राजकारणापासून दूर आहे, मला आशा आहे की, 11 वर्षे कंझर्व्हेटिव्ह नेता आणि सहा वर्षे पंतप्रधान म्हणून माझा अनुभव महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांना मदत करेल. कॅमेरून 2010 ते 2016 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. ब्रेक्झिटवरील सार्वमतानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. किंबहुना, या सार्वमतामध्ये बहुतांश लोकांनी युरोपियन युनियन (EU) मधून ब्रिटन वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले.
दरम्यान, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली आहे. सुएला यांनी पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांवर पोलिस खूप उदार असल्याचा आरोप केला होता. एला ब्रेव्हरमन यांनी ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी लंडनमधील निदर्शने कठोरपणे हाताळली जात नसल्याचा आरोप केला होता. सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्यांवरून पीएम ऋषी सुनक यांच्यावर त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अनेक सदस्यांचा दबाव होता आणि त्यांना विरोधकांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सुनक यांनी त्यांना पदावरून हटवले आहे.