जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | फेब्रुवारी ०५, २०२३.
ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे सांगून मंत्री महाजन म्हणाले, राज्यातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण नागरिक, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी ग्रामविकास विभाग खूप महत्त्वाचा विभाग असून त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव व मार्गदर्शन मिळाल्यास इतरांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे रोजगारासाठी वळतात, हे चित्र बदलायचे आहे. शहरांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून आमुलाग्र बदल करायचे आहेत. शहरे, गावे स्वच्छ झाली पाहिजेत. ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी हागणदारीमुक्ती, सांडपाण्याची व्यवस्था आदी व्यवस्था चांगल्याप्रकारे होतील यासाठी योजनांची अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागात दुर्गंधी हटवण्यासाठी शोषखड्डे हा प्रभावी उपाय असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.