अबू रोड – आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचे जीवनच धकाधकीचे जीवन बनले आहे यापासून पत्रकारही अलिप्त नाहीत. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून पत्रकारांना वेगळ्या अध्यात्मिक आनंदाचा अनुभव व्हावा यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्तरावर पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. पत्रकारच समाज परिवर्तनाचे काम प्रभावीपणे करू शकतात, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे राष्ट्रीय समन्वय आणि मीडिया विंग प्रमुख ब्रह्माकुमार निकुंज भाई यांनी बोलताना केले.
आज गुरुवारी सायंकाळी आनंद सरोवर येथील सभागृहात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाला प्रारंभ झाला. यावेळी पुढे बोलताना ब्रह्माकुमार निकुंजभाई म्हणाले, ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी शांती,सद्भावना आवश्यक आहे.आणि यासाठीच माध्यमांनी सातत्याने निरपेक्ष बुद्धीने कार्य करावे.पत्रकारांनी आपले कार्य करत असताना चांगल्या ध्येयाची जाणीव ठेवावी आणि सहानभूतीच्या भावनेतून कार्य करावे. यातूनच समाजामध्ये चांगले वातावरण विश्वास निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.