ठाणे: प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी लोकल पकडण्यावरून नागरिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता,दिवा शहरातील वाढती प्रवासी संख्या व अपुऱ्या गाड्या या लक्षात घेऊन दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी स्वतंत्र लोकल सकाळच्या वेळेस सुरू करण्यात यावी अशी मागणी दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मेलद्वारे केले आहे.
रेल्वे मंत्र्यांना पाठवलेल्या मेल मध्ये रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे की,बुधवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात लोकल फलाट क्रमांक चार ऐवजी दोन वर आल्याने नागरिकांची अचानक एकच गर्दी निर्माण झाली व यातून पुढे सदर लोकल साधारण पंधरा मिनिटं दिवा स्थानकात थांबून राहिली.प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्यासाठी गर्दी केली. या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला यामध्ये प्रवाशांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत.
दिवा रेल्वे स्थानकात कल्याण डोंबिवलीच्या दिशेने भरून येणाऱ्या लोकल थांबत असल्या तरी या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी दिव्यातील प्रवाशांना चढण्यास जागा मिळत नाही. परिणामी चेंगराचींगरी होते. अनेक प्रवाशांना डोंबिवलीला जाऊन पुन्हा गाडी पकडावी लागते असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आपण दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान सकाळच्या वेळेस स्वतंत्र लोकल सुरू करावी ही माझी दिवावासीयांच्या वतीने आपणाकडे विनंती आहे असे भाजपचे रोहिदास मुंडे यांनी या मेल मध्ये म्हटले आहे.
जाहिरात