पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरीचं पेव फुटलं असून पक्षाचे नेते गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आहे. ते बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
नवी मुंबई- भारतीय जनता पक्षानं पहिल्याच यादीत गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही त्यांच्या घरातील बंडखोरी रोखण्यात त्यांना आणि पक्षाला अपयश आलं आहे. नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
संदीप नाईक हे माजी आमदार आहेत. आगामी निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छुक होते. मात्र, पक्षानं विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यामुळं नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे.
आज निर्धार मेळावा…
बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या संदीप नाईक यांनी आज वाशी इथं निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेणार आहेत. कार्यकर्ते जो सांगतील तो निर्णय मी घेईन. हा मेळावा कार्यकर्त्यांनीच आयोजित केला आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी कार्यकर्तेच निर्णय घेणार आहेत, असं संदीप नाईक वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले.
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळीही नाईक कुटुंबातील दोघे जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. गणेश नाईक यांना बेलापूरमधून तर संदीप नाईक यांना एरोलीमधून तिकीट हवं होतं. मात्र, भाजपनं फक्त गणेश नाईक यांनाच ऐरोलीमधून तिकीट दिलं. त्यावेळी संदीप नाईक यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. आता मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
*lगणेश नाईक मुलाचा प्रचार करणार नाहीत!..
संदीप नाईक यांनी बंडखोरीचे संकेत दिल्यानंतर त्यांचे वडील व भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी मुलाचा प्रचार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गणेश नाईक यांना एरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.